जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असल्यानं केरळच्या IASनं दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 11:56 AM2019-08-25T11:56:14+5:302019-08-25T11:56:44+5:30
कन्नन गोपीनाथ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे.
तिरुवनंतपुरम: केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. कन्नन गोपीनाथ ऑगस्ट 2018मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी राज्यातील भीषण पुरातून लोकांचं बचावकार्य राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेशांचे केडर राहिलेल्या आणि वर्षं 2012च्या बॅचचे आयएएस अधिकारी क्न्न यांनी केंद्राकडे राजीनामा पाठवला आहे. ते म्हणाले, देशातल्या एका मोठ्या भागात अनेक काळापासून मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. तसेच इतर राज्यांकडून त्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यानं मला दुःख होतं. असा अन्याय समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत होत असतो. मला हे स्वीकारार्ह नाही.
खरं तर ऑगस्ट 2018 रोजी केरळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे गोपीनाथ स्वतःच्या राज्यात पोहोचले होते आणि कोणतीही चर्चा होऊ न देता बचावकार्य राबवत राहिले. त्याचदरम्यान एर्नाकुलमचे कलेक्टर मोहम्मद वाई सफिरुल्ला यांनी एका ठिकाणी त्यांना ओळखलं. या सामाजिक कार्यानं गोपीनाथ यांना आत्मिक समाधान मिळालं, पण त्यांचं नुकसान झालं.
केंद्रशासित प्रदेशातल्या पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत करत आहात, याचा रिपोर्ट न दिल्यानं कन्नन यांना केंद्रानं नोटीस पाठवली होती. गोपीनाथ म्हणाले, सेवेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करायचं याचा विचार केलेला नाही. फक्त मला आता ही सरकारी नोकरी लवकरात लवकर सोडायची आहे. हाच माझा उद्देश आहे.