Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:53 IST2018-03-03T13:44:08+5:302018-03-03T16:53:40+5:30
त्रिपुरामध्ये भाजपाने डावे आणि काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. त्रिपुरामधील २५ वर्षांची सत्ता भाजपाने उलथून टाकली आहे.

Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी
नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीने त्रिपुरामधील डाव्यांचा पूर्व भारतातील शेवटचा गड उद्ध्वस्त केला आणि एक नवा इतिहास रचला आहे. त्रिपुरामधील ६० पैकी ४१ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. १९९३ पासून सत्तेत असणाऱ्या डाव्यांना सत्तेतून बाजूला करण्याचे काम यावेळेस भाजपाने करुन दाखवले आहे. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते. मात्र माकपाला केवळ १८ जागांवर रोखण्यात भाजपाला यश आले आहे.
With Tripura win for BJP ; "Communist Party of Kerala"(We have no other Branches)
— Meenakashi Lekhi (@M_Lekhi) March 3, 2018
त्रिपुरामधील डाव्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे आता केवळ केरळ हे एकमेव राज्य उरले आहे. भाजपाच्या दिल्लीमधील खासदार मीनाक्षी लेखी यांनी याकडे लक्ष वेधत एक खोचक टिप्पणी ट्वीटरवर केली आहे. आता माकपा केरळमध्ये म्हणेल, आमची शाखा कोठेही नाही. अशा शब्दांमध्ये त्यांनी डाव्यांचा समाचार घेतला आहे. तर राकेश सिन्हा यांनी आता माणिक 'सरकार' हा इतिहास झाला आहे अशा शब्दांमध्ये कोटी केली आहे.
Tripura election is preface of Kerala election. Manik has become past tense , now @vijayanpinarayi will be next Manik.
— Prof Rakesh Sinha (@RakeshSinha01) March 3, 2018
Whatever the final result, the BJP’s rise in Tripura is astonishing. Regional parties (TDP,TRS,DMK) have quickly gone from zeroes to heroes jn their own state. But for a national party to so suddenly become so prominent in a state where they had no presence seems unprecedented.
— Ramachandra Guha (@Ram_Guha) March 3, 2018
तर रामचंद्र गुहा यांनी भाजपाचा त्रिपुरामधील विजय आश्चर्यकारक आहे असे सांगितले. द्रमुक, तेलुगू देसम पक्ष, तेलंगण, राष्ट्र समितीसारख्या प्रादेशिक पक्षांनी शून्यातून सत्ता मिळवण्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा राष्ट्रीय पक्षाने मिळवलेले यश अभूतपूर्व आहे असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भाजपाचे विजयासाठी पद्धतशीर प्रयत्न
गेली २५ वर्षे त्रिपुरात तळ ठोकून बसलेल्या डाव्यांच्या गढीला धक्का देण्याची कल्पना भाजपाच्या नेतृत्वाने मांडली आणि तसा पद्धतशीर आराखडाही तयार केला. भाजपाचे सुनील देवधर हे गेली चार ते पाच वर्षे या राज्यात तळ ठोकून आहेत. ज्या राज्यात एकही जागा गेल्या विधानसभेत जिंकता आली नव्हती आणि जेथे डाव्यांचा अभेद्य किल्ला होता अशा ठिकाणी भाजपाने पाय रोवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. मात्र काँग्रेसने डाव्यांना विरोध करण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नाही. भाजपाने सुनील देवधर, पक्षाचे सरचिटणीस राम माधव, आसासममधील महत्त्वाचे नेते हेमंत बिस्वा सर्मा आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांच्यासारखी नेत्यांची फळी निर्माण केली. त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालयातील प्रत्येक प्रदेशात जाऊन प्रचार करत जनमत उभे केले.
डाव्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे ६० जागांच्या विधानसभेत १० आमदार होते तरीही काँग्रेसने डाव्यांना पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी फारसे काही केले नाही. यामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा भाजपाने मात्र घेतला. होय, डाव्यांचं सरकार उलथवता येऊ शकतं, असं सांगत रस्त्यावर उतरुन जनमत आपल्या बाजूने आणण्यासाठी भाजपा कार्यरत राहिला. भाजपाने शून्यातून येऊन एवढी मोठी झेप घेणे आश्चर्य वाटायला लावणारी आहेच. दुसरीकडे काँग्रेस मात्र आपण स्पर्धेतच नाही, ही निवडणूक जणू माकपा आणि भाजपा यांच्यामध्ये सुरू असल्याच्या थाटात शांत राहिली. डाव्यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात किंवा त्याचे मतांमध्ये रुपांतर करण्यात काँग्रेसने हालचाल केली नाही. त्याचाच परिणाम आता मतमोजणीत दिसत आहे. एकेकाळी त्रिपुरामध्ये सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष माकपाच्या पंचविस वर्षात प्रभावहीन झाला होता पण निवडणुकीच्या निमित्ताने आव्हान देण्याची संधी या पक्षाने घालवली असे वाटते.