याला म्हणतात नशीब! कर्जामुळे घर विकणार तितक्यात 2 तास आधी अचानक लागली 1 कोटीची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:34 PM2022-07-28T12:34:35+5:302022-07-28T12:39:40+5:30
50 वर्षीय व्यक्तीवर खूप कर्ज होतं. त्याने व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी 50 लाखांचं लोन घेतलं होतं.
नवी दिल्ली - कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कर्जामुळे एक व्यक्तीने आपलं राहतं घर विकण्याचा निर्णय घेतला. पण घर विकण्याच्या दोन तास आधीच त्याचं नशीब पालटलं आहे. अचानक 1 कोटीची लॉटरी लागली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून 50 वर्षीय व्यक्तीवर खूप कर्ज होतं. त्याने व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी 50 लाखांचं लोन घेतलं होतं.
बँक आणि आपल्या काही नातेवाईकांकडून त्याने हे कर्ज घेतलं होतं. पण आता ते कर्ज फेडण्यासाठी पैशांची अत्यंत गरज होती. मिळालेल्या माहितीनुसार, कासरगोड जिल्ह्यातील मंजेश्वरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद बावा यांनी यासाठी आपलं घर विकण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी लॉटरी लागल्याने आता त्यांनी हा निर्णय बदलला आहे. बावा यांनी मीडियाला मी लॉटरी जिंकली आहे. त्यामुळे आता मला घर विकण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. तसेच सर्व प्रश्नही सुटतील असं सांगितलं.
लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ते व्यवसायामुळे खूप चिंतित होते. अशाच वेळी ईश्वराने त्यांना हा मार्ग दाखवला आहे. त्यांनी एका विक्रेत्याने केरळ सरकारची 50-50 लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. त्यानंतर मला ही लॉटरी लागली आहे. मला आणि कुटुंबीयांना याचा खूप आनंद झाला आहे. लॉटरीचे पैसे मिळाल्यावर कर्ज फेडणार आणि उरलेली रक्कम गरीब, गरजुंसाठी खरेदी करणार असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.