Video - भीषण! दुकानात चहा पीत असताना अचानक झाला खिशातील मोबाईलचा स्फोट अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:28 AM2023-05-19T09:28:02+5:302023-05-19T09:36:44+5:30
एका वृद्ध व्यक्तीच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि त्याला आग लागली.
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि त्याला आग लागली. सुदैवाने आगीतून वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राज्यात मोबाईल फोनचा अचानक स्फोट होण्याची ही तिसरी घटना आहे.
आजची घटना मारोटिचल भागातील एका चहाच्या स्टॉलवर 76 वर्षीय व्यक्ती चहा घेत असताना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याचीच जोरदार चर्चा रंगली आहे, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा माणूस एका दुकानात बसून चहा पिताना आणि काहीतरी खाताना दिसतो, तेव्हा त्याच्या शर्टच्या खिशातील फोनचा स्फोट होतो आणि त्याला आग लागली.
A 70-year-old Kerala man had a lucky escape after a #MobilePhone exploded in his pocket. The incident happened in #Thrissur.#CCTV#mobileblastpic.twitter.com/BEQb8TphW8
— Bobins Abraham Vayalil (@BobinsAbraham) May 18, 2023
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर हा व्यक्ती खूप घाबरतो. चहाचा ग्लास बाजूला ठेवून खिशातून पटकन मोबाईल काढण्याचा प्रयत्न करतो आणि याच दरम्यान फोन खाली पडतो. फोन खाली पडल्याने तो व्यक्ती वाचला आहे. ओल्लूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही.
गेल्या आठवड्यात कोझिकोड शहरात अशीच एक घटना घडली होती जिथे ट्राउजरच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन एक व्यक्ती जखमी झाला होता. याआधी 24 एप्रिल रोजी त्रिसूरमधील एका आठ वर्षांच्या मुलीचा मोबाईलचा स्फोट होऊन मृत्यू झाला होता. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.