केरळला मुसळधार पावसाचा तडाखा, 9 वर्षांच्या मुलीसह 24 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 05:33 PM2018-06-14T17:33:27+5:302018-06-14T17:37:05+5:30
केरळमध्ये सातत्यानं कोसळत असलेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे.
तिरुवनंतपुरम- केरळमध्ये सातत्यानं कोसळत असलेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोझिकोडेमध्ये मुसळधार पावसानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर दहा जण बेपत्ता आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे, ज्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर या मुसळधार पावसानं 24 जणांचा मृत्यू झालाय.
कोझिकोडेच्या थेमरेसरीमध्ये भूस्खलनामुळे नऊ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीचं नाव डेलना आहे. भूस्खलनामुळे त्या मुलीचं घर ढिगा-याखाली दबलं गेलं आहे. इडुक्की, वेनाद आणि कोझिकोडे जिल्ह्यांत भूस्खलन आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आपत्ती प्रशासन विभागानं कोझिकोडेतल्या पूरग्रस्त स्थितीबाबत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही मदत मागितली आहे.
कन्नूर, कोझिकोडे, कोट्टायम आणि आलपुष्पा जिल्ह्यात बचाव शिबिरं स्थापण्यात आली आहेत. या जिल्ह्यात शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोझिकोडेमध्ये 474 लोक बचाव शिबिरात आहे. कोझिकोडेमधलं कक्कयम धरणाचे दरवाजे लवकरच उघडण्यात येणार आहेत. कोट्टयम आलपुष्पा, वायनाड आणि कोझिकोडे जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. बुधवारी पठाणमट्टियामध्येही एका 82 वर्षीय आणि एक 20 वर्षीय व्यक्तीचा पुरात बुडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे 272 घरांचं प्राथमिक स्वरूपात नुकसान झालं आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिका-यांनी इडुक्की जिल्ह्यातील डोंगरी भागात रात्री प्रवास करण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्य नद्या भारथपुझा आणि पल्लकड जिल्ह्यातील भवानी आणि सिरुवानी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, इडुक्की आणि मूलपेरियार तलावही पूर्णतः भरले आहेत. इडुक्की धरणातील पाण्याची पातळी 2,324.50 फूट स्तरावर पोहोचली आहे. जी धरणाच्या क्षमतेच्या आर्धी आहे. तसेच इडुक्की भागातल्या तलावही पूर्णतः भरल्यानं अनेक तलावांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या मुसळधार पावसानं केरळ आणि कर्नाटकाला जोडणारा पूल मुसळधार पावसानं वाहून गेला आहे. कन्नूरमध्ये 100हून झाडं रस्त्यावर कोसळल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे.