प्रेयसीशी लग्न करण्यासाठी 'तिनं' केलं लिंग परिवर्तन, आता गर्लफ्रेंडनं सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:55 PM2018-12-25T16:55:58+5:302018-12-25T16:57:21+5:30
केरळमधल्या एका महिलेनं पुरुष होण्यासाठी लिंग परिवर्तन केलं आहे. जेणेकरून तिला दुसऱ्या महिलेशी लग्न करता येईल.
थिरुअनंतपूरम- केरळमधल्या एका महिलेनं पुरुष होण्यासाठी लिंग परिवर्तन केलं आहे. जेणेकरून तिला दुसऱ्या महिलेशी लग्न करता येईल. परंतु त्या गर्लफ्रेंडनं आता लग्न करण्यास नकार दिला आहे. 23 वर्षांची दीपू (आताच्या दर्शन)नं पेरुवन्नामुझीमध्ये दोन महिन्यांपूर्वीच लिंग परिवर्तन केलं आहे.
सोमवारी दीपूनं पत्रकार परिषद घेत संवाद साधला. दीपू म्हणाला, मी सर्वासाठीच आता चेष्टेचा विषय ठरत आहे. चेन्नईतल्या एका हॉस्पिटलमध्ये 2 लाख रुपये भरून प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मी लिंग परिवर्तन केलं. माझी प्रेयसी वडाकार येथे राहते, असंही दीपू म्हणाला. दीपूनं प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. दीपू म्हणाला, आम्ही एकत्र राहण्यासाठी संयुक्तरीत्या निर्णय घेतला होता. त्यासाठीच मी माझं लिंग परिवर्तन केले. जेणेकरून मला प्रेयसीशी लग्न करता येईल. परंतु 25 ऑक्टोबरला मी जेव्हा सर्जरी केली, त्यानंतर प्रेयसीनं माझ्याकडे येण्यास नकार दिला. आता तिचं लग्न वडाकार इथल्याच एका व्यक्तीबरोबर ठरलं आहे. तसेच दीपूनं त्या प्रेयसीचं लग्न होणाऱ्या पतीलाही धमकावलं असून, आमच्या दोघांमधून तू साइटला हो, असंही दीपू म्हणाला आहे.
दीपूनं यासंदर्भात पेरुवन्नामुझी इथल्या पोलिसांशी संपर्क साधला, परंतु त्या महिलेनं दीपूकडे न जाण्याच्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यासाठी आता उच्च न्यायालयात दीपूनं याचिकाही दाखल केली आहे. त्या महिलेचं पुढील महिन्यात लग्न असून, दीपू तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण प्रेयसीच्या सांगण्यावरूनच दीपूनं लिंग परिवर्तन केल्याचं त्याचं म्हणणं आहे.