केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 02:19 AM2019-08-18T02:19:13+5:302019-08-18T02:19:34+5:30

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

Kerala rains killed 113; 29 civilians still missing | केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

Next

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागातील शिबिरातील स्थलांतरित लोक आता घरी परतू लागले आहेत. तथापि, भूस्खलन आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्यातील मृतांची संख्या शनिवारी ११३ वर पोहोचली आहे.

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना झाल्या होत्या. या ठिकाणी आता सर्च आॅपरेशन सुरू आहे. हैदराबादेतील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये २१, वायनाडमध्ये ७ आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. पाऊस आणि पुरामुळे १२,७६१ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ११८६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ८०५ शिबिरात १,२९,५१७ लोक राहत आहेत.

हिमाचलमध्ये ६ लोकांना वाचविले
सिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाने कहर केला असून, पालमपूरमध्ये पुरामुळे फसलेल्या ६ जणांना वाचविण्यात आले आहे. कांगडामध्ये सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत, तर कांगडा आणि चम्बा जिल्ह्यात भूस्खलनानंतर अनेक रस्ते अद्याप बंद आहेत. आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे.

मध्यप्रदेशात पावसाचे आतापर्यंत ७० बळी
भोपाळ : पश्चिमी मध्यप्रदेशच्या काही भागांत सततच्या पावसाने पूर कायम आहे. पूर आणि संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्याच्या इतर भागांत शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिव जी. व्ही. रश्मी यांनी सांगितले की, ७० पैकी १५ जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे.
येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंदिरा सागरसह सहा मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ११७ लोकांना वाचविण्यात आले आहे. पुरामुळे ४२९८ लोक विस्थापित झाले आहेत, तर २३६८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

कोलकात्यात मुसळधार पावसाचा इशारा
कोलकाता : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत वीज कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानात जनजीवन विस्कळीत
जयपूर : राजस्थानात गत काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त कोटा आणि आजूबाजूच्या भागांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत १३७ मि.मी. पाऊस झाला.

Web Title: Kerala rains killed 113; 29 civilians still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.