NoroVirus: चिंताजनक! कोरोना संकट कायम असताना नव्या विषाणूची एंट्री; नोरोव्हायरसनं चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:32 PM2021-11-12T18:32:33+5:302021-11-12T18:35:02+5:30
कोरोना संकटात आता नव्या व्हायरसची एंट्री; केरळात सापडले १३ रुग्ण
थिरुअनंतपुरम: संपूर्ण जग गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. भारतात कोराना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मात्र कोरोनाच्या विळख्यातून देश अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. त्यातच आता केरळमध्ये नोरोव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. वायनाड जिल्ह्यात नोरो विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केरळ सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
नोरो विषाणू दूषित पाणी आणि खाद्यपदार्थांमधून पसरतो. या विषाणूची लागण झाल्यावर उलटी आणि अतिसाराचा त्रास होतो. दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील विथिरीजवळ पुकोडे येथे एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातीय जवळपास १३ विद्यार्थ्यांना नोरो विषाणूची लागण झाली. सुदैवानं या विद्यार्थ्यांमधून कोणालाही विषाणूचा संसर्ग झाला नाही. सध्या या विषाणूबद्दल जनजागृती करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
कसा पसरतो विषाणू?
कोरोना प्रमाणेज नोरोदेखील संपर्कात आल्यानंतर पसरतो. यामुळे अतिसार, उलटी, पोटदुखीचा त्रास होतो. दूषित पाणी, दूषित अन्न आणि नोरो बाधितांच्या संपर्कात आल्यानं विषाणूची लागण होते. नोरोची लागण झालेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातूनच त्याची इतरांना बाधा होते.
पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरोची लागण परिसराच्या बाहेर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी झाली. त्यानंतर त्यांचे नमुने घेण्यात आले. ते अलाप्पुझामधील विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले गेले. राज्याच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.