वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:23 PM2024-10-28T16:23:05+5:302024-10-28T16:24:13+5:30
विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते.
शिक्षणासाठी अनेकांना फार कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, केरळमधील एका विद्यार्थिनीने तिची स्वप्न सत्यात उतरवण्याचा निर्धार केला आहे आणि ती दररोज त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. केरळमधील चेरथला येथील विनिशा ही शाळेत जाण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि त्याच वेळी आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर शाळेबाहेरच भुईमुगाच्या शेंगा विकते.
विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते. बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठं कर्ज झाल्याने विनिशाने भुईमुगाच्या शेंगा विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर आहेत आणि आई भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करते. हे विकण्यासाठी तासनतास उभे राहिल्याने त्याच्या आईला पाय दुखायचे.
घरची परिस्थिती आणि आईला होणार त्रास पाहून विनिशाने पुढाकार घेऊन भुईमुगाच्या शेंगा विकण्याचा मोठा निर्णय घेतला. विनिशा गेल्या चार वर्षांपासून तिच्या पालकांना मदत करत आहे. एशियानेटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनिशा म्हणाली की ती दुपारी साडेचार वाजता काम सुरू करते आणि रात्री आठ वाजेपर्यंत करत असते.
भुईमुगाच्या शेंगा विकल्यानंतर ती अभ्यासासाठी घरी जाते. ती प्रामाणिकपणे काम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र रस्त्यावरून जाणारे लोक तिची कशी चेष्टा करतात हे देखील तिने सांगितलं. ती आधी शाळेनंतर ट्यूशनला देखील जायची. पण आता हे काम करत असल्याने दोन्ही गोष्टी करणं तिच्यासाठी अवघड आहे. त्यामुळे तिने भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे.