टेलरचा मुलगा बनला लखपती, 19 लाखांच्या पॅकेजची मिळाली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 01:58 PM2018-04-19T13:58:21+5:302018-04-19T13:58:21+5:30
नागपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या केरळमधील मुलाने घरच्या गरिबीवर मात करत लाखो रुपयांचं पॅकेज असणारी नोकरी मिळविली आहे.
नागपूर- नागपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या केरळमधील मुलाने घरच्या गरिबीवर मात करत लाखो रुपयांचं पॅकेज असणारी नोकरी मिळविली आहे. केरळमधील कोल्लम शहरात राहणाऱ्या जस्टिन फर्नांडिस या मुलाने आयआयएम नागपूरमध्ये शिक्षण पूर्ण केलं. जस्टिन अतिशय गरिब कुटुंबातून होता. कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याच्याकडे सोयी-सुविधाही नव्हत्या. जस्टीनने मिळविलेल्या यशावर त्याचाही विश्वास बसत नाहीये. जस्टीनला हैदराबाजमधील व्हॅल्यू लॅब या कंपनीमध्ये असिस्टंट डायरेक्टर पदावर 19 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज असणारी नोकरी मिळाली आहे. आयआयएम नागपूरमधील हा एक रेकॉर्ड आहे.
जस्टिनचं कुटुंब टेलरिंगचं काम करतं. पण त्यांच्या या कामात त्यांना खूप नुकसान सहन करावं लागलं. जस्टिनचे आजोबा टेलर होते. वडिलही टेलरचंच काम करतात. पण रेडिमेड कपड्यांच्या ट्रेण्डमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. घरातील खर्चही या कामामुळे निघत नाही, असं जस्टिनने सांगितलं. शिक्षण सर्वकाही बदलू शकतं असा विश्वास जस्टिनच्या काकुला होता. त्यामुळे त्याने अभ्यास करण्यात जराही तडजोड केली नाही. जस्टिनच्या काकुने त्याचं व त्याच्या बहिणीचं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून दिलं. त्यानंतर त्रिवेंद्रमधील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर संपूर्ण खर्च स्कॉलरशिपवर होऊ लागला.