जिथे दलित महिला आमदारानं दिले धरणे, 'त्या' जागी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं 'शुद्धीकरण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 09:51 AM2019-07-29T09:51:50+5:302019-07-29T09:54:11+5:30
युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक 'शुद्धीकरण' कार्यक्रम राबवल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्लीः केरळमधल्या भाकपाच्या एका दलित महिला आमदारानं धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन केलं होतं. त्याच ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक 'शुद्धीकरण' कार्यक्रम राबवल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. त्या दलित महिला आमदारानं काँग्रेस जातीवादाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. राज्यातील मंत्र्यांनीही युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे कृत्य शोभनीय नसल्याचं म्हटलं आहे.
त्रिशूरच्या जवळ चेरप्पूमध्ये नत्तिकातल्या आमदार गीता गोपी परिसरातल्या रस्त्याची दुर्दशा झाल्याच्याविरोधात अभियंता कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यांच्याविरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मार्च काढला. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जिथे गीता धरणे आंदोलनाला बसल्या होत्या, तिथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक शुद्धीकरण करत गायीचं शेणमिश्रित पाणी त्या जागेवर शिंपडलं.
त्या महिला आमदारानं काँग्रेसवर जातीवादाचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांत यासंदर्भात तक्रारही दिली आहे. केरळचे सांस्कृतिक मंत्री ए. के. बलान यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अशा घटना या जास्त करून उत्तर भारतात घडतात, हे स्वीकारार्ह नसल्याचं ते म्हणाले आहेत.