केरळची लोकसंख्या ‘जैसे थे’?
By Admin | Published: March 29, 2015 01:23 AM2015-03-29T01:23:44+5:302015-03-29T01:23:44+5:30
गेल्या एका दशकात सर्वांत कमी लोकसंख्या वृद्धी दर राखणारे केरळ राज्य येणाऱ्या वर्षात लोकसंख्येत शून्य वृद्धी नोंदविण्याचा गौरव मिळविण्याची शक्यता आहे.
थिरुवअनंतपूरम : गेल्या एका दशकात सर्वांत कमी लोकसंख्या वृद्धी दर राखणारे केरळ राज्य येणाऱ्या वर्षात लोकसंख्येत शून्य वृद्धी नोंदविण्याचा गौरव मिळविण्याची शक्यता आहे.
राज्य नियोजन मंडळाच्या ताज्या आर्थिक सर्वेक्षणानुसार गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येतील वृद्धीचा राष्ट्रीय दर १७.६ टक्के होता. यादरम्यान केरळ राज्यातील हा वृद्धी दर ४.९ टक्के राहिला. भारतातील विविध राज्यांच्या तुलनेत केरळचा लोकसंख्या वृद्धी दर सर्वांत कमी आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात २०१४ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार केरळमधील लोकसंख्येतील वृद्धी दर शून्य टक्क्यांकडे किंवा नकारात्मक दराच्या दिशेन जात आहे. जनगणना संचानालयाच्या अंतिम आकडेवारीचा हवाला देत या अहवालात म्हटले आहे की, मार्च २०११ मध्ये केरळची लोकसंख्या ३,३४,०६,०६१ होती. २००१ मध्ये ३,१८,४१,३७४ लोकसंख्या होती.
केरळच्या एकूण लोकसंख्येत पुरुषांची संख्या १,६०,२७,४१२ (४८ टक्के), तर महिलांची संख्या १,७३,७८,६४९ (५२ टक्के) आहे. यापैकी ६४.१ टक्के लोकांचे वयोमान १५ ते ५९ वर्षांदरम्यान आहे.(वृत्तसंस्था)