दीक्षान्त समारंभाच्या पोशाखात खादीचे उपरणे
By admin | Published: July 12, 2016 12:49 AM2016-07-12T00:49:02+5:302016-07-12T00:49:02+5:30
मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) विद्यार्थी आगामी दीक्षान्त समारंभात अंगावर खादीचे उपरणे (अंगवस्त्र) पांघरून आपापल्या पदव्या स्वीकारणार आहेत.
नवी दिल्ली : मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) विद्यार्थी आगामी दीक्षान्त समारंभात अंगावर खादीचे उपरणे (अंगवस्त्र) पांघरून आपापल्या पदव्या स्वीकारणार आहेत.
मुंबई ‘आयआयटी’ने खादीचे उपरणे हा त्यांचा दीक्षान्त समारंभाचा पोशाख म्हणून स्वीकारला असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले आहे. दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांना अंगावर पांघरता यावीत, यासाठी आयआयटीने खादीच्या ३,५०० उपरण्यांसाठी ‘आॅर्डर’ दिल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ही उपरणी ‘हनी कोम्ब टॉवेल कॉटन खादी’ची असतील.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे एक महत्त्वाचे पाऊल असून, खादीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त होत असल्याचेच यावरून स्पष्ट होते. नरेंद्र मोदी सरकारने पारंपरिक वस्त्रोद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यावर भर दिला असून, खादी त्याच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमातही देशवासीयांना खादीचे कपडे वापरण्याचे आवाहन अनेकदा केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस खादीचा पेहराव करून कार्यालयात यावे, असे परिपत्रक कार्मिक खात्यानेही मध्यंतरी काढले होते.
हे सूत्र पकडून विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलैमध्ये सर्व विद्यापीठांना व संलग्न महाविद्यालयांना एक परिपत्रक पाठवून दीक्षान्त समारंभांसह अन्य कार्यक्रमांच्या वेळी खादी आणि हातमागावर विणलेले कपडे वापरण्याची सूचना केली होती. गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाने त्यानंतर लगेचच दीक्षान्त समारंभासाठी खादीचा पोशाख वापरण्याचे
ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)