बाजू मांडण्यासाठी खडसे दिल्लीत!
By admin | Published: June 10, 2016 05:02 AM2016-06-10T05:02:39+5:302016-06-10T05:02:39+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजपाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी येथे दाखल झाले.
प्रमोद गवळी,
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजपाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी येथे दाखल झाले. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. परदेशदौरा आटोपून मोदी गुरुवारी रात्रीच राजधानीत परतत आहेत. मोदींव्यतिरिक्त खडसे हे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत.
खडसे त्यांच्या सून आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे थांबले असून ते संपूर्ण तयारीनिशी आले आहेत, असे वाटते. त्यांच्यासोबत कागदपत्रांचा मोठा गठ्ठा आहे. आपण मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटीची वेळ मिळाली नव्हती.
लाल दिव्याची गाडी गेल्यामुळे खडसे अस्वस्थ आहेत. त्यांनी ज्या दिवशी पदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी मोदी परदेश दौऱ्यावर रवाना झाले होते. त्यामुळे खडसे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नव्हती.
आपल्यावर आरोप करणाऱ्यांना आतापर्यंत पुरावे देता आलेले नाहीत. तरीही आपण पदाचा राजीनामा दिला, असे खडसे यांनी राजीनाम्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस गेल्या आठवड्यात दिल्लीला आले होते व त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन खडसेंवरील आरोपांबाबतचा अहवाल त्यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. या घडामोडीच्या दुसऱ्या दिवशी खडसेंकडे राजीनामा मागण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शुक्रवारी येथे येणार असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या दौऱ्याबाबत सकाळीच ठोस काही कळू शकेल.