खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण : कॅनडाच्या खासदाराने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 05:37 PM2018-02-22T17:37:06+5:302018-02-22T17:41:08+5:30
भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जसपाल अटवाल याला कॅनडाचे खासदार रणदीप एस सराय यांनी निमंत्रण दिले होते. याबाबत खासदार रणदीप एस सराय यांनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचे कबूल करत याप्रकरणी माफी मागितली आहे.
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जसपाल अटवाल याला कॅनडाचे खासदार रणदीप एस सराय यांनी निमंत्रण दिले होते. याबाबत खासदार रणदीप एस सराय यांनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचे कबूल करत याप्रकरणी माफी मागितली आहे.
जस्टिन ट्रुडो यांच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमाचे जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण गेल्याने एकच खळबळ उडाली. खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांना भेटण्यात आपल्याला अजिबात रस नाही असे जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने कॅनडा सरकारची मोठी पंचाईत झाली आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या ट्रुडो यांच्या कार्यक्रमाल जसपाल अटवाल उपस्थित होता. ट्रुडो यांची पत्नी सोफी आणि कॅनडा सरकारमधील मंत्री अमरजीत सोही यांच्यासोबत त्याने काढलेला फोटोही प्रसिद्ध झाला आहे.
.@randeepssarai takes responsibility for inviting Jaspal Atwal and apologizes. Full statement here. #cdnpolipic.twitter.com/4nVdkBuxWz
— Abigail Bimman (@AbigailBimman) February 22, 2018
जस्टिन ट्रुडो यांच्या दौऱ्यात आणखी वाद उदभवू नये यासाठी कॅनडाचे राजदूत नादीर पटेल यांनी आज रात्री दिल्लीत होणाऱ्या डिनर कार्यक्रमाचे जसपाल अटवालचे निमंत्रण रद्द केले आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये पत्रकारांनी जस्टिन ट्रुडो यांना तुम्ही खलिस्तानी दहशतवाद्यांना का निमंत्रण दिले ? असा प्रश्न विचारला. त्यावर जस्टिन ट्रुडो यांनी उत्तर द्यायचे टाळले.
जसपाल अटवाल फुटीरतावादी चळवळीमध्ये सहभागी होता. बंदी घातलेल्या शीख युथ फेडरेशनचा तो सदस्य आहे. 1986 साली कॅनडामध्ये पंजाब सरकारमधील मंत्री मलकीयत सिंग सिंधू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणात जसपाल अटवालला न्यायालयाने दोषी ठरवून 20 वर्षाची शिक्षा सुनावली. कॅनडामध्ये झालेल्या हल्ल्यातून मलकीयत सिंधू बचावले होते पण नंतर पुढे भारतात त्यांची हत्या झाली.