खलिस्तान प्रश्नावरून नरेंद्र मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 05:55 PM2018-02-23T17:55:33+5:302018-02-23T17:55:33+5:30
खलिस्तानबाबत कणव दाखवणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहेत.
नवी दिल्ली - खलिस्तानबाबत कणव दाखवणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहेत.मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारताची एकता आणि अखंडतेला आव्हान देणे खपवून घेतले जाणार नाही, असे खडसावून सांगितले. फाळणीची बिजे पेरणाऱ्यांना इथे कोणतीही जागा नसल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी मोदी म्हणाले,"कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत आमचे अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्याची गरज आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा भारत आणि कॅनडासारख्या लोकशाहीवादी देशांसाठी धोका आहे. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि कट्टरतावाद हा खपवून घेतला जाऊ शकत नाही."
" ट्रूडो यांच्या भारत दौऱ्याची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. त्यामुळे तुम्ही भारत दौऱ्यावर आला आहात याचा आनंद आहे. कॅनडामध्ये एक लाख 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आता दोन्ही देशांमधील नागरिकांना सुलभपणे ये-जा करता यावी यासाठी एमओयू ऑफ हायर एज्युकेशनवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत." असे मोदी म्हणाले.
We discussed many issues including deference operation. Terrorism & extremism are a threat to countries like ours and to fight these elements it is important for us to come together: PM Modi pic.twitter.com/tqZmvoegrH
— ANI (@ANI) February 23, 2018
कॅनडा हा युरेनियमचा मोठा पुरवठादार असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रामध्येही सहकार्य वाढवण्याबाबत सहमती झाल्याची माहिती दिली. कॅनडामध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांनी मिळवलेल्या यशाचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. तसेच कॅनडासोबतची रणनीतिक भागीदारी पुढे नेण्याला भारत अधिक महत्त्व देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतात करण्यात आलेल्या जोरदार स्वागतासाठी सर्वांचे आभार मानले. अनेक घटक भारत आणि कॅनडामधील मैत्री वाढवण्यास मदतगार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण सहा करारांवर सह्या झाल्या.