वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:29 AM2023-10-04T09:29:16+5:302023-10-04T09:29:50+5:30
Cricket World Cup Matches: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव सुरू आहे. यादरम्यान, खलिस्तान्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव सुरू आहे. यादरम्यान, खलिस्तान्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे भिंतींवर खलिस्तान झिंदाबाद अशा घोषणा लिहिण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मशालामध्ये विश्वचषक सामन्यांपूर्वी अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार खलिस्तानच्या समर्थकांनी धर्मशालामधील सरकारीच विभागाच्या भिंतींवर स्प्रे पेंटिंगच्या माध्यमातून खलिस्तान झिंदाबाद अशा घोषणा लिहिल्या आहेत. मात्र या घटनेनंतर पोलीस विभागामध्ये खळबळ माजली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच भिंतींवर लिहिण्यात आलेल्या घोषणा पुसण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी भिंतींवर अशा घोषणा दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जलशक्ती विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. काळ्या रंगाच्या स्प्रे पेंटिंगने या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. स्थानिक व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती.
त्यानंतर डीएसपी वीर बहादूर आणि एएसपी हितेश लखनपाल आणि पोलीस ठाणे धर्मशालाची टीमही घटनास्थळी दाखल झाली होती. आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधूनही माहिती मिळवली जात आहे. जलशक्ती विभागाचे चौकीदार असलेल्या अश्वनी कुमार यांनी सांगितले की, भिंतीवर घोषणा कुणी लिहिल्या हे मला माहिती नाही. मी तेव्हा ऑफिसमध्ये होतो. इथे पोलीस आले होते. त्यांनीही माझ्याकडे चौकशी केली. मात्र मला याबाबत फार माहिती नाही आहे.