खलिस्तानी दहशतवाद्याच्या कटाचे आरोप फेटाळले; यादवचे कुटुंबीय म्हणतात, सरकारने खरे सांगावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:49 AM2024-10-21T09:49:01+5:302024-10-21T09:52:05+5:30
भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे.
प्राणपुरा: भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे. मात्र, अमेरिकेने लावलेले आराेप विकास यादवने फेटाळले आहेत. विकास यादवचा चुलतभाऊ अविनाश याने त्याच्याशी चर्चा केली हाेती. अमेरिकेने लावलेले सर्व आराेप खाेटे असल्याचे ताे म्हणाला. दिल्लीपासून सुमारे १०० किलाेमीटर अंतरावर प्राणपुरा येथे विकास यादवचे कुटुंबीय राहतात.
विकास हा भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’चा अधिकारी असून, पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘एफबीआय’ने केला आहे. या संदर्भात अविनाश याने सांगितले की, त्याने कधीही आपण ‘राॅ’साठी काम करत असल्याचे सांगितले नाही. ताे आजही आमच्यासाठी ‘सीआरपीए’मध्ये काम करताे, एवढीच माहिती आहे, असे अविनाश म्हणाला. खरे काय हे फक्त विकास व सरकारलाच माहिती आहे. सरकारने खरे काय ते सांगायला हवे, असे विकासचा दुसरा चुलतभाऊ अमित म्हणाला. (वृत्तसंस्था)
विकासचा ठावठिकाणा माहिती नाही
ताे सध्या कुठे आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. मात्र, ताे त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसाेबत राहत असल्याचे अविनाश यादव याने सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांनीही विकासच्या ठावठिकाण्याबाबत टिप्पणी केलेली नाही.
काश्मीरमध्ये सहा परप्रांतीय मजुरांची हत्या
सुरेश डुग्गर, लाेकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा टार्गेट किलिंग केले आहे. गंदेरबल जिल्ह्यात गगनगीर भागात दहशतवाद्यांनी परप्रांतीय कामगारांवर बेछूट गाेळीबार केला. त्यात एका डॉक्टरसह सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, साेनामर्गजवळ दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सहा मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर पाेलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून, शाेधमाेहीम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. उमर अब्दुल्ला हे नुकतेच गंदेरबल मतदारसंघातून विजयी झाले आहेत.