कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये खलिस्तानी दहशतवादी, पत्नी सोफीसोबत काढला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:09 PM2018-02-22T12:09:04+5:302018-02-22T12:19:00+5:30
भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमाचे जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांना भेटण्यात आपल्याला अजिबात रस नाही असे ट्रुडो यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने कॅनडा सरकारची मोठी पंचाईत झाली आहे.
मंगळवारी मुंबईत झालेल्या ट्रुडो यांच्या कार्यक्रमाल जसपाल अटवाल उपस्थित होता. ट्रुडो यांची पत्नी सोफी आणि कॅनडा सरकारमधील मंत्री अमरजीत सोही यांच्यासोबत त्याने काढलेला फोटोही प्रसिद्ध झाला आहे. जसपाल अटवालने पंजाब सरकारमधील मंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याला 20 वर्षाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती.
ट्रुडो यांच्या दौऱ्यात आणखी वाद उदभवू नये यासाठी कॅनडाचे राजदूत नादीर पटेल यांनी आज रात्री दिल्लीत होणाऱ्या डिनर कार्यक्रमाचे जसपाल अटवालचे निमंत्रण रद्द केले आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्रिदेऊ यांना तुम्ही खलिस्तानी दहशतवाद्यांना का निमंत्रण दिले ? असा प्रश्न विचारला. त्यावर ट्रुडो यांनी उत्तर द्यायचे टाळले.
अटवाल फुटीरतावादी चळवळीमध्ये सहभागी होता. बंदी घातलेल्या शीख युथ फेडरेशनचा तो सदस्य आहे. 1986 साली कॅनडामध्ये पंजाब सरकारमधील मंत्री मलकीयत सिंग सिंधू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणात जसपाल अटवालला न्यायालयाने दोषी ठरवून 20 वर्षाची शिक्षा सुनावली. कॅनडामध्ये झालेल्या हल्ल्यातून मलकीयत सिंधू बचावले होते पण नंतर पुढे भारतात त्यांची हत्या झाली.