पाकी सैन्याला संपवणाऱ्या भारतीय जवानाची भूमिका करेल का फवाद खान?
By Admin | Published: September 30, 2016 02:30 PM2016-09-30T14:30:47+5:302016-09-30T15:23:34+5:30
पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम द्यायची एवढी हौसच असेल तर करण जोहर, शाहरूख खान प्रभृतींनी भारत पाकिस्तान युद्धावरच एक चित्रपट बनवावा आणि त्यामध्ये भारतीय सैनिकाची भूमिका फवाद खानला
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम द्यायची एवढी हौसच असेल तर करण जोहर, शाहरूख खान प्रभृतींनी भारत पाकिस्तान युद्धावरच एक चित्रपट बनवावा आणि त्यामध्ये भारतीय सैनिकाची भूमिका फवाद खानला किंवा अली जफरला ऑफर करावी. पाकिस्तानी सैन्याचा खात्मा करताना भारत माता की जय असं सिनेमात का होईना पण हे पाकिस्तानी कलाकार घोषणा देणार असतील तर कदाचित भारतीय प्रेक्षक त्या पाकिस्तानी कलाकाराला डोक्यावरच घेतील. गुलाम अलींच्या मुंबईतल्या शोला शिवसेनेने विरोध केला आणि तो कार्यक्रम रद्द झाला. पण, जर काही अली जफर वा फवाद खाननं भारतीय लष्करातला अधिकारी रंगवला आणि रुपेरी पडद्यावर पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारली तर कुणी सांगावं, उद्धव ठाकरे अली जफर वा फवाद खानचा शिवसेना भवनमध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील.
कलेमध्ये राजकारण आणू नये, कलाकार हे केवळ कलेचे भोक्ते असतात आणि ते राजकीय वैमनस्याचे शिकार बनू नयेत, अशी मुक्ताफळे कथित विद्वान उधळत असतात. हे जर खरं असेल, तर मग पाकिस्तानी कलाकारांनीही बॉलीवूडमध्ये भारतीय सैनिक रंगवायला काय हरकत आहे. त्यासाठी अक्षय कुमार, सैफ अली खान किंवा सनी देओलसारखे भारतीय कलाकारच का लागतात? अभिनय करणं हाच तुमचा पेशा आहे, ना मग करा की असे रोल...
पण, केवळ गल्ल्याचा विचार करणाऱ्या बॉलीवूडमधल्या निर्मात्यांची फवाद खानला असा रोल ऑफर करण्याची हिंमत होणार नाही, आणि दाखवली तरी तो स्वीकारण्याची धमक फवाद दाखवणार नाही. कारण, त्याला माहित्येय, चित्रपटाचं प्रदर्शन बघायला तो जिवंत राहणार नाही.
संगीतालाही देशाची बंधनं नसतात हे खरंय. त्यामुळेच, लता मंगेशकरांसारख्या गोनकोकिळेला पाकिस्तानाचे दरवाजे बंद असूनही, भारताने पाकिस्तानी गायकांसाठी दरवाजे खुले ठेवले होते. त्यामुळेच, गुलाम अली, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लमसारखे कलाकार भारतामध्ये प्रसिद्धी मिळवू शकले आणि सोबत चांगलंच मानधनही... या पाकिस्तानी गायकांनाही, जर सहिष्णू भारताचे लाभ हवे असतील तर त्यांनी अदनान सामीसारखी भूमिका उघड मांडावी आणि पाकिस्तान विरोधातल्या लष्करी कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करावं. त्यांना हे मंजूर नसेल तर मात्र त्यांनी खुशाल मैफिली कराव्यात, पण त्या पाकिस्तानात!