अरुणाचलमध्ये खांडू नवे मुख्यमंत्री

By admin | Published: July 17, 2016 07:01 AM2016-07-17T07:01:26+5:302016-07-17T07:01:26+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने

Khandu new Chief Minister in Arunachal | अरुणाचलमध्ये खांडू नवे मुख्यमंत्री

अरुणाचलमध्ये खांडू नवे मुख्यमंत्री

Next

इटानगर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने शनिवारी नाट्यपूर्ण खेळी करत अरुणाचल प्रदेशात नेतृत्वबदल केला.
राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ३६ वर्षांचे पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. सहा महिन्यांपूवी खालिको पुल यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले. बैठकीनंतर खांडू राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे गेले आणि त्यांनी ४५ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी खांडू यांना लगेच सरकार स्थापनेसाठी पाचारण केले नसले तरी उद्या रविवारी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, अशी अपेक्षा आहे. पेमा खांडू हे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे चिरंजीव असून ते तुकी यांच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री होते.
पुल हे बंडखोर आमदार व भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची गच्छंती होऊन झाली. राज्यपालांनी तुकी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली. मात्र काँग्रेसने नेतृत्त्वबदल केल्याने शक्तिप्रदर्शन करण्याची वेळच आली नाही.
काँग्रेसच्या बैठकीत तुकी यांनी खांडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला व उपस्थित सर्व ४४ आमदारांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, पुल बंडखोर आमदारांसह आले. अरुणाचलच्या ६० सदस्यीय विधानसभेत आता आमदारांची संख्या ५८ असून काँग्रेसने दोन अपक्ष आमदारांसह ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी तुकी यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आपला मनोदय सांगून नवा नेता निवडण्याच्या पक्षाच्या निर्णयाचीही त्यांना कल्पना दिली. (वृत्तसंस्था)

उशिरा सुचलेले शहाणपण
- सहा महिन्यांपूर्वी नबाम तुकी
यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून ३० आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांना हाताशी धरून आणि राज्यपालांचा राजकीय डावपेचात वापर करून भाजपाने आधी राष्ट्रपती राजवट लागू केली व नंतर बंडखोर काँग्रेस नेते खालिको पुल यांचे सरकार स्थापन केले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने घड्याळाचे काटे उलटे फिरल्यावर काँग्रेसला शहाणपण सुचले व तुकी यांना दूर करून पक्षातून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यात काँग्रेसला यश आले. सहा महिन्यांपूर्वीच तुकी यांना दूर केले असते तर पुढचे सर्व रामायण टळले असते.

आता कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्तक्षेपाने पक्ष एकजूट आहे.
-पेमा खांडू, नियोजित मुख्यमंत्री

Web Title: Khandu new Chief Minister in Arunachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.