सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:09 PM2023-06-21T16:09:26+5:302023-06-21T16:11:09+5:30
खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे.
नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या महेंद्रसिंह धोनीने अतिशय कष्टप्रद परिस्थितीतून देशाचं आणि स्वत:चं नाव जगभर झळकावलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोण्यासाठी धोनी जीवनात मोठा संघर्ष केला आहे. बिहार संघाकडून रणजी क्रिकेट खेळताना धोनीला रेल्वेत नोकरी लागली होती. त्यावेळी, धोनीची पहिली पोस्टींग ही प. बंगालमधील खडगपूर रेल्वे स्थानकात झाली होती. आता, याच खडगपूर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून अमृत भारत स्टेशन योजनेत या स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.
खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे. या रेल्वे स्टेशनच्या सुविधांसाठी, विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच, अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत या स्थानकाचा समावेश करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी दिली. तसेच, योग्य आणि नियोजित पद्धतीने या स्टेशनचा विकास करण्यात येणार असल्याचंही वैष्णव यांनी म्हटले आहे.
#WATCH | Kharagpur, West Bengal: Kharagpur station is one of the most complex stations in Asia. The electronic interlocking system here is one of the largest electronic interlocking systems in Asia. Kharagpur railway station has been included under the Amrit Bharat station scheme… pic.twitter.com/teRur7ojbS
— ANI (@ANI) June 21, 2023
महेंद्रसिंह धोनी बिहारसाठी रणजी क्रिकेट खेळत असताना टीसी म्हणून त्याला रेल्वेत नोकरी लागली होती. त्यावेळी, धोनीची पहिली पोस्टींग याच खडगपूर रेल्वे स्थानकावर झाली होती. सन २००१ ते २००३ या कालावधीत धोनी रेल्वेत नोकरी करत असल्याने येथील स्टेडियमवरच क्रिकेट खेळत होता. रेल्वेच्या टीमसाठीही धोनीने येथे क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, एम.एस.धोनी द अनटोल्ट स्टोरी या चित्रपटातही धोनीने खडगपूर रेल्वे स्टेशनवर नोकरी केल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी, धोनीची नोकरी आणि क्रिकेट यांची सांगड घालताना झालेली दमछाकही चित्रपटात दिसून आली होती.