रायन स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी खट्टर सरकार तयार, नितीश कुमारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 02:38 PM2017-09-11T14:38:51+5:302017-09-11T14:40:17+5:30
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाला खट्टर सरकारनं सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिली आहे. वाढत्या दबावाखातर खट्टर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्नच्या हत्येची कुटुंबीयांना अपेक्षित असणारी चौकशी करणार, असं आश्वासनही हरणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांना दिलं आहे.
चंदीगड, दि. 11 - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाला खट्टर सरकारनं सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिली आहे. वाढत्या दबावाखातर खट्टर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्नच्या हत्येची कुटुंबीयांना अपेक्षित असणारी चौकशी करणार, असं आश्वासनही हरणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांना दिलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रद्युम्न हत्या प्रकरणात मनोहर लाल खट्टर यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे.
नितीश पत्रकारांना म्हणाले, माझी खट्टर यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच त्यांना प्रद्युम्नच्या घरी भेट देण्याचीही विनंती केली आहे. त्यामुळे प्रद्युम्नच्या कुटुंबीयांना एक प्रकारची ताकद मिळेल. त्यांना आपल्यासोबत कोणीतरी असल्याचं वाटेल. तसेच प्रद्युम्नच्या हत्येत दोषी असलेल्यांना कडक शिक्षा करणार असल्याचंही खट्टर यांनी आश्वासन दिल्याचं नितीश कुमार म्हणाले आहेत. तसेच प्रद्युम्न हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या रायन पिंटो यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे.
प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनलचे रिजनल हेड आणि एचआर हेड यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात सोहना पोलीस ठाण्याच्या एसएचओंना निलंबित करण्यात आलं आहे. रायन इंटरनॅशनल शाळा मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Heinous crime! Talked to CM Khattar. He is concerned & assured no culprit would be spared: Bihar CM Nitish Kumar on #Pradyuman murder case pic.twitter.com/XtrvhTwKD2
— ANI (@ANI) September 11, 2017
तपासात अनेक त्रुटी
मुलाच्या हत्येला दोन दिवस झाले पण अजूनही खरं काय आहे ते समोर आलं नाही. हत्या का झाली यामागील सत्य समोर यावं, हीच माझी इच्छा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासातून काही गोष्टी सुटल्या आहेत. म्हणूनच या घटनेची सीबीआय चौकशी व्हायला हवी. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासावर मी समाधानी नसून मुलाच्या हत्येप्रकरणाचा सविस्तर तपास हवा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासात अनेक त्रुटी आहे. म्हणूनच सीबीआयने तपास करायला हवा, असं प्रद्युम्नच्या वडिलांनी म्हटलं आहे.
प्रद्युम्नच्या आईचा आत्महत्येचा इशारा
रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हत्या झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या आईने आत्महत्येचा इशारा दिला आहे. प्रद्युम्नच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही, तर आत्महत्या करेन, असा इशारा प्राम्नच्या आईने दिला आहे. तर प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.
शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या प्रकरणी शाळेच्या बस कंडक्टर अटक करण्यात आली आहे. पण या हत्येमागे कंडक्टर नसावा, कोणी अन्य यामागे आहे, असा आरोप प्रद्युम्नच्या आईने केला आहे. पोलीस कोणाला तरी वाचवण्यासा प्रयत्न करत आहेत. खरा आरोपी पकडला न गेल्यास आत्मदहनाचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. आरोपी बसवाहक अशोक असं कृत्य करूच शकत नाही, अशी माहिती चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. त्याच्याकडे चाकूही नव्हता, असं चालकाचं म्हणणं आहे.