'वड्रा' यांचा जमीन व्यवहार रद्द करणारे खेमका केंद्र सेवेत!
By admin | Published: July 15, 2014 04:44 PM2014-07-15T16:44:12+5:302014-07-15T17:44:45+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करून चर्चेत आलेले आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पंतप्रधान कार्यालयात नेमणूक होण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१५ - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करून चर्चेत आलेले आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची लवकरच पंतप्रधान कार्यालयात नेमणूक होण्याची शक्यता आहे.
खेमका यांच्या नावाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दिला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. विशेष म्हणजे, खेमका यांच्याविरोधात दोन चार्जशीट दाखल असतानाही त्यांची बदली होत असल्याने अशोक खेमका यांच्या कामावर मोदी सरकार मेहेरबान असल्याची चर्चा आहे.
अशोक खेमका हे हरयाणा सीड डेव्हलोप्मेंट कॉर्पोरेशन (एसएसडीसी) पदावर कार्यरत असताना त्यांची बदली जानेवारी २०१४ मध्ये जमीन व्यवहारासंबधी असलेल्या डायरेक्टर पदावर करण्यात आली होती. या पदावर येताच खेमका यांनी रॉबर्ट वॉड्रा आणि डीएलएफ यांच्यात झालेला ८ कोटी रूपयांच्या व्यवहार रद्द ठरवित त्यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. खेमका यांच्या या निर्णयामुळे देशभर मोठे वादळ उठले होते. त्यांच्यावर हरयाणा सरकारनेही नाराजी व्यक्त केली होती. खेमका यांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही असे सांगत खेमका यांच्याविरोधात दोन चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. परंतू लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ताबदल झाला असून आता केंद्रात मोदी यांचे सरकार असल्याने मोदी सरकारने त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवित त्यांना केंद्र सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हरियाणा सरकारमधील कॅबिनेट सचिवालयाने अशोक खेमका यांना हरियाणा सरकारमधून केंद्र सरकारमध्ये घेण्याची विनंती केली असून ही विनंती स्वीकारत केंद्र सरकारने खेमका यांना केंद्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे.