पंतप्रधान भेटणार खोमेनींना
By admin | Published: May 6, 2016 05:21 PM2016-05-06T17:21:44+5:302016-05-06T17:21:44+5:30
इराणशी संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. २१ मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण दौऱ्यावर जात असून ते या भेटीत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांचीही भेट घेणार आहेत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने मध्यपूर्वेतील देशांशी संबंध अधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवी पावले टाकली आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईनला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भेट दिल्यानंतर आता इराणशी संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. २१ मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण दौऱ्यावर जात असून ते या भेटीत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांचीही भेट घेणार आहेत. खोमेनी यांच्या भेटीला दौऱ्यात सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून या भेटीमुळे जगभरात दोन्ही देशांच्या मैत्रीचे संकेत जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी सौदी अरेबिया आणि युएइला भेट दिलेली आहे.
यापुर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र पधान आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराणला भेट देऊन पंतप्रधानांच्या भेटीची पार्श्वभूमी तयार केलेली आहे. १९७९च्या इराणमधील खोमेनी क्रांतीनंतर भारताने इराण व अमेरिका यांच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. आता इराणवरील निर्बंध उठविण्यात आल्याने पुन्हा संबंध वृद्धींगत करण्याची संधी भारत घेत आहे. भारताने याभेटीआधीच इराणमध्ये तेल, वायू, रसायन व खते या क्षेत्रांमध्ये २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या तेहरान भेटीत, भारताच्या तेलाच्या गरजेबाबत इराणहा विश्वासू भागीदार समजण्यात हरकत नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या राजनैतिक, मुत्सद्दी, व्यापार संबंधांना गती आली आहे.
इराणमध्ये चाबहार बंदराच्या विकासाची जबाबदारी भारताने उचलल्यामुळेही आशिया व पाश्चिमात्य देशांना मोठा संदेश देण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पाकिस्तानमधील ग्वादार बंदराची उभारणी चीन करत असल्यामुळे चीन व पाकिस्तानला चाबहारच्या निमित्ताने भारताने चोख प्रत्युत्तर दिले असे समजले जाते. या भेटीमध्ये पंतप्रधान चाबहारला भेट देऊन तेथील वायू क्षेत्राचीही पाहणी करणार आहेत यामुळे कदाचित चाबहार ते गुजरात अशी समुद्राखालून १४०० किमी लांब वायूवहन नलिकेच्या प्रकल्पास गती मिळेल असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या तेहरान भेटीमुळे काही नवे पडसादही उमटण्याचीही शक्यता आहे. इस्रायलने इराणबाबत नेहमीच टोकाची भूमिका घेतली आहे, इस्रायलप्रमाणे पाकिस्तान व अमेरिकेत याचे काय पडसाद उमटतात याकडे पाहणे आवश्यक आहे.