‘कल हो ना हो’च्या व्हिडिओत खुर्शीद!
By admin | Published: April 26, 2015 01:53 AM2015-04-26T01:53:45+5:302015-04-26T01:53:45+5:30
भारतातील जर्मनीचे राजदूत मायकल स्टेनर यांनी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचा संगीत व्हिडिओ बनविला आहे.
जर्मन राजदूतांची निर्मिती : स्टेनर यांच्या पत्नी बनल्या प्रीती झिंटा
नवी दिल्ली : भारतातील जर्मनीचे राजदूत मायकल स्टेनर यांनी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचा संगीत व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओत माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी या चित्रपटातील सैफ अली खानची भूमिका साकारली आहे.
खुर्शीद यांच्यासोबत प्रीती झिंटाच्या रूपात राजदूत स्टेनर यांच्या पत्नी एलिसी आहेत. या चित्रपटातील टायटल साँग जर्मन राजदूतांना प्रचंड आवडले आणि त्यातूनच या अल्बमची निर्मिती झाले. जावेद अख्तर यांनी लिहिलेले हे गाणे सोनू निगमने गायले आहे. या गाण्यावर अभिनय करणे हे फार मोठे आव्हान होते, असे स्टेनर यांनी सांगितले. शाहरुख खान हा एक अत्यंत ताकदीचा अभिनेता असून त्याची भूमिका साकारणे फारच अवघड होते. बॉलीवूड आणि तेथील दिग्गज कलाकारांप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच आपण ‘लिंब-येत्सस- कल हो ना हो’ या अल्बमची निर्मिती केली, अशी भावना स्टेनर यांनी व्यक्त केली. एकमेकांप्रती असलेली सद्भावना व संस्कृतींची देवाणघेवाण याच्याशी मुत्सद्देगिरीची पाळेमुळे जुळली आहेत, असे मत खुर्शीद यांनी व्हिडिओमागील भूमिका स्पष्ट करताना व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)