PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 01:11 PM2024-11-29T13:11:27+5:302024-11-29T13:13:43+5:30
Khyati Hospital PMJAY-Scam : गुजरातमध्ये पंतप्रधान-जन आरोग्य योजनेतील फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
Khyati Hospital PMJAY-Scam : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एसजी हायवेवर असलेले ख्याती हॉस्पिटल देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. निरपराधांना अंधारात ठेवून शासकीय योजनेचा लाभ घेत रुग्णालयाकडून पैसे उकळण्याचे मोठे षडयंत्र रचले जात होते. बोरीस्ना गावातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.
गुजरातमध्ये पंतप्रधान-जन आरोग्य योजनेतील फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये एक जण १८ वर्षांचा होता, ज्याच्यावर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी अँजिओप्लास्टी केली होती.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, मेहसाणाच्या बोरिसाना गावातील दोन रुग्णांचा अँजिओप्लास्टीनंतर ११ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत्यूच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की, गेल्या १८ महिन्यांत ख्याती हॉस्पिटलमध्ये असेच आणखी तीन प्रकरणे आढळून आली, त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. याबाबत सत्य बाहेर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत बेकायदेशीर फायद्यांसाठी लोकांचा जीव धोक्यात घालण्याच्या प्रकरणात ख्याती हॉस्पिटलची आणखी रहस्ये उघड होत आहेत. वैद्यकीय शिबिरात प्राथमिक तपासणीनंतर अहमदाबादच्या एका हॉस्पिटलने १८ वर्षीय तरुणावर अँजिओप्लास्टी केल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले आहे, ज्यामुळे अवैध आर्थिक फायद्यासाठी आणखी तरुणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी आणखी चार मृत लोकांबद्दल माहिती जाणून घेतली. ज्यांचा मृत्यू हॉस्पिटलच्या अनावश्यक अँजिओप्लास्टीमुळे झाल्याचा संशय आहे. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला कळले आहे की आरोपीने अगदी लहान रुग्णांवर अँजिओप्लास्टी केली होती, ज्यात एका १८ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आम्हाला अद्याप प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिकाऱ्यांकडून अशी कागदपत्रे मिळालेली नाहीत, ज्या अंतर्गत वैद्यकीय प्रक्रिया केली गेली. एकदा आम्हाला कागदपत्रे मिळाल्यावर, आम्ही सर्व रुग्णांना ओळखण्यास सक्षम होऊ."
याचबरोबर, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या रुग्णांना त्यांच्या संबंधित गावात शिबिरे आयोजित करून अँजिओप्लास्टीसाठी नेण्यात आले होते. हॉस्पिटलवाल्यांनी प्रत्येक बाबतीत हीच पद्धत अवलंबली आहे. मेहसाणातील बोरिसाना गावातील महेश बारोट (५२) आणि नागर सेनमा (७२) या दोन रुग्णांच्या ११ नोव्हेंबर रोजी अँजिओप्लास्टीमुळे मृत्यू झाल्याची चौकशी सुरू आहे. एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, दोघांनाही अँजिओप्लास्टीची गरज नव्हती, परंतु तरीही ऑपरेशन करण्यात आले.
पाच आरोपींना अटक!
सोमवारी अहमदाबाद क्राइम ब्रँचने खेडा जिल्ह्यातील कपडवंजजवळील एका शेतातून पाच आरोपींना अटक केली. यामध्ये हॉस्पिटलचे संचालक (मार्केटिंग आणि ब्रँडिंग) चिराग राजपूत याचा समावेश आहे, जो पीएम-जेएवाय आणि इतर सरकारी योजनांमधून बेकायदेशीर नफेखोरीचा कथित सूत्रधार आहे. त्याच्यासोबत आणखी तीन लोक आहेत, ज्यांचे काम अहमदाबाद आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये शिबिरे आयोजित करणे आणि कसेतरी सामान्य डॉक्टरांना भेटणे आणि रुग्णांना ख्याती हॉस्पिटलमध्ये पाठवणे हे होते. बुधवारी स्थानिक न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. १३ नोव्हेंबर रोजी ख्याती हॉस्पिटलचे संस्थापक कार्तिक पटेल, संचालक डॉ संजय पटोलिया, हृदयरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत वझिरानी, राजश्री कोठारी आणि राजपूत यांच्याविरुद्ध तीन एफआयआर नोंदवण्यात आले होते.