मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:45 AM2024-03-09T06:45:28+5:302024-03-09T06:46:48+5:30
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
इम्फाळ : भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) या पदावर कार्यरत अधिकाऱ्याचे त्याच्या घरातून सशस्त्र लोकांनी अपहरण केले. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. कोनसाम खेडा सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो चारंगपत ममंग लेकाई या गावचा रहिवासी आहे.
कोनसाम सुटी घेऊन आपल्या गावी आले होते. काही जण त्यांच्या घरात घुसले. काेनसाम यांना ते बळजबरीने एका वाहनातून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. अधिकाऱ्याच्या अपहरणामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कोनसाम खेडा सिंह यांच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागण्याचे व त्यासाठी धमक्या दिल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुरक्षा दलांनी कोनसाम यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम राबविली आहे. महामार्गावरील प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आल्यापासून आतापर्यंत सुरक्षा दलांचे काही जवान व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
अशा झाल्या कारवाया
सप्टेंबर २०२३मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी जवान सेर्टो थांगथांग कोम यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी चुराचंदपूर जिल्ह्यात एका एसयूव्हीमधून प्रवास करत असलेल्या लष्करी जवानाच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन चाैघांची हत्या करण्यात आली.