मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किडनी विकली, मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:47 AM2024-07-10T11:47:32+5:302024-07-10T11:49:41+5:30
देशाच्या अनेक भागात किडनी टोळी सक्रिय
देशाच्या अनेक भागात किडनी टोळी सक्रिय असून, लोकांना पैशाचे आमिष दाखवून ते किडनी दान करायला लावतात. मधुबाबू गारलापट्टी हा आंध्र प्रदेशातील ३१ वर्षीय ऑटोचालकही या टोळीचा बळी ठरला आहे. कर्जबाजारी मधुबाबूला त्याच्या किडनीच्या बदल्यात ३० लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
सुरुवातीला केवळ ५० हजार रुपये हातात टेकवत त्याची किडनी काढून घेण्यात आली. मधुबाबू म्हणाला की, त्यांनी माझ्या आर्थिक अडचणींचा फायदा घेतला.
या पैशामुळे मला माझे कर्ज फेडण्यास आणि माझ्या मुलांचे भविष्य चांगले होईल, असे वाटल्याने मी हा निर्णय घेतला. मधुबाबूने त्याची डावी किडनी दान करण्याचे मान्य केले होते. तरी त्याची उजवी किडनी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची चर्चा होत आहे.
२५ लाख द्या, अवयव बदला; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय अवयवदानाचे एक रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या एका महिला डॉक्टरसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा मास्टरमाइंड बांगलादेशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२०१९पासून हे रॅकेट सुरू होते. एका ऑर्गेन डोनर आणि रिसिव्हरला अटक करण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले.
महिला डॉक्टरही...
महिला डॉक्टरचे नाव विजया कुमारी असे आहे. या रॅकेटमध्ये काम करणारी ती एकमेव डॉक्टर आहे. ती किडनी निष्णात ट्रान्सप्लांट सर्जन आहे. रुग्णालयात कामाच्या आधारे पेमेंट या तत्त्वावर काम करायची. प्रत्यारोपणासाठी ती स्वतःच रुग्ण घेऊन येत होती. एका प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २५ ते ३० लाख रुपये घेतले जायचे.