Kill Narendra Modi! पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल प्राप्त; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:57 AM2020-09-04T09:57:11+5:302020-09-04T09:59:16+5:30
हा ईमेल ८ ऑगस्ट रोजी मिळाला होता. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला धोका असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला आहे. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या आहेत. NIA ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या ३ शब्दांचा वापर करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA)ने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. ज्यानंतर गृहमंत्रालयाने तात्काळ SPG ला अलर्ट केले आहे. एसपीजीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सध्या NIA कडून ईमेलमधील कन्टेंन्टची तपासणी सुरु आहे. याबाबत गृहमंत्रालयाला पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे. या पत्रात एनआयएला एक ईमेल प्राप्त झाला असून त्यात काही लोकांच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. यातील मजकूर आणि ईमेल कॉपी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रासोबत जोडली आहे.
हा ईमेल ८ ऑगस्ट रोजी मिळाला होता. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला धोका असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. या ईमेलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा आणखी कडक आणि वाढवण्यात आली. एनआयए प्रमुख सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहे. यात रॉ, गुप्तचर संस्था, सुरक्षा तज्ज्ञ यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका तासात गोळीने ठार मारु असं धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीने ११२ नंबरवर पोलिसांना फोन करुन ही धमकी दिली होती. लखनऊवरुन ही सूचना नोएडा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ या तरुणाला मामूरा गावात अटक करण्यात आली होती. या आरोपीचं नाव हरभजन सिंह असं होतं. ज्यावेळी त्याला अटक केली तेव्हा तो नशेत होता असंही पोलिसांनी सांगितले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक करण्यात आले होते. हे खाते त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटशी जोडलेले होते. या खात्यावर त्यांचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. खाते हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉइनची मागणी करण्यास सुरुवात केली. हॅकर्सनी ट्विट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडामध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी मागितली. काही काळानंतर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले.
हॅकर्सची मागणी
हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले, कोरोनासाठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये तुम्ही देणगी द्या, असे मी आपणास आवाहन करतो. पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून जवळपास अर्धा डझन ट्विट केले गेले. सर्व ट्विटमध्ये पैसे देण्याची मागणी करण्यात आली होती. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींची वैयक्तिक वेबसाइट नोंदणीकृत असल्याची कबुली दिली होती
बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन एक प्रकारचे व्हर्च्युअल चलन आहे. डॉलर, रुपया किंवा पौंड सारखी ही इतर चलन देखील वापरली जाऊ शकते. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्ये देखील ते बदलले जाऊ शकते. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात आले. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठी केला जात आहे.