दिवसभर व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरत असल्यानं पतीकडून पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 12:31 PM2018-04-17T12:31:05+5:302018-04-17T12:31:05+5:30
पत्नीनं घराकडे दुर्लक्ष केल्याचं पतीनं सांगितलं
गुरुग्राम: स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्या पत्नीची पतीनं गळा दाबून हत्या केली आहे. पत्नी दिवसरात्र फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरत असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली पतीनं पोलिसांकडे दिली. या प्रकरणी पती पोलिसांच्या अटकेत आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली.
पती हरिओमनं गुन्ह्याची कबुली देताना पत्नी लक्ष्मीच्या स्मार्टफोनच्या अति वापराचा वारंवार उल्लेख केला. 'पत्नीच्या बेसुमार स्मार्टफोन वापराला मी कंटाळलो होतो. ती सतत मोबाईल वापरत राहायची. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर तिचं अखंडपणे चॅटिंग सुरू असायचं. या नादात तिचं कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. ती मला, मुलाला जवळपास विसरुनच गेली होती. आई, पत्नी म्हणून ती कधीच घरात लक्ष देत नव्हती,' असं 35 वर्षांच्या हरिओमनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं.
हरिओमनं गुरुग्राममधील त्याच्या घरात पत्नी लक्ष्मीची (32) हत्या केली. रात्री लक्ष्मी झोपली असताना हरिओमनं तिचा गळा दाबला. सकाळी लक्ष्मीचे वडिल बलवंत सिंग मुलीला भेटायला तिच्या घरी आले. तेव्हा त्यांना बेडवर लक्ष्मीचा मृतदेह आढळून आला. यावेळी हरिओम लक्ष्मीच्या मृतदेहाजवळच बसून होता. यानंतर बलवंत सिंग यांनी पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हरिओमला पोलिसांनी महानगर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.