पाककडून उखळी तोफांचा मारा सुरूच
By Admin | Published: October 8, 2014 02:58 AM2014-10-08T02:58:43+5:302014-10-08T02:58:43+5:30
पाक रेंजर्सनी सोमवारच्या मध्यरात्री जम्मू व सांबा जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या ४० भारतीय चौक्या व जवळपासच्या २५ ठिकाणांवर तीनदा हल्ले चढवीत गोळीबार केला
जम्मू : भारत-पाकदरम्यान झालेल्या शस्त्रसंधी कराराचे आॅक्टोबर महिन्यातले १७ वे उल्लंघन करीत पाक रेंजर्सनी सोमवारच्या मध्यरात्री जम्मू व सांबा जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या ४० भारतीय चौक्या व जवळपासच्या २५ ठिकाणांवर तीनदा हल्ले चढवीत गोळीबार केला असून यात नऊजण जखमी झाले आहेत. जम्मू व अन्य भागात या गोळीबाराविरुद्ध व पाकविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक सैनिकांनी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी बलनोई भागात लहान शस्त्रांद्वारे गोळीबार सुरू केला. पाकच्या या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी तात्काळ उत्तर दिले. पाकिस्तानी रेंजर्सनी अरनिया भागात गोळीबार करीत मोर्टार डागले. यातील एक मोर्टार पोलीस ठाण्याच्या परिसरात आदळल्याने सहाजण जखमी झाले. पाकने केलेल्या या उल्लंघनाला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सडेतोड उत्तर दिले असून, काही भागात हा गोळीबार अद्याप सुरू आहे. बीएसएफचे प्रवक्ते विनोद यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक रेंजर्सने कुठल्याही कारणाविना सोमवारी रात्री ९च्या सुमारास बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला व मोर्टार डागले. पाकने अरनिया, आर.एस.पुरा, कानाचक व परगवाल सब सेक्टर्सला आपले लक्ष्य बनविले होते. या ठिकाणी असलेल्या बीएसएफच्या चौक्यांवरील जवानांनी या गोळीबाराला तात्काळ उत्तर देणे सुरू केले. या गोळीबारात तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रात्री एक हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात
आले.
या महिन्यात पाकने केलेल्या गोळीबारात सहाजण ठार झाले असून बीएसएफच्या जवानांसह ५० जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अरनिया भागात नागरी वसाहतींवर केलेल्या गोळीबाराचा निषेध केला असून, पाकजवळ काश्मीरखेरीज बोलण्यासारखे काही उरले नाही असे प्रतिपादन केले आहे. बीएसएफचे महासंचालक डी.के. पाठक यांनी, ईद दिवशी पाककडून गोळीबाराची अपेक्षा नव्हती असे मत व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)