जमावाने ठार मारण्याच्या घटना घृणास्पद
By admin | Published: July 1, 2017 01:07 AM2017-07-01T01:07:38+5:302017-07-01T01:07:38+5:30
देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले. अशा घटना भविष्यात न घडण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरील कायदा राबवणाऱ्या यंत्रणांनी परिणामकारक पावले उचलली पाहिजेत, असे नायडू म्हणाले.
गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून झारखंडमध्ये जमावाने गुरुवारी एकाला ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. त्याआधी झारखंडमध्येच एकाच्या घराबाहेर गाय मेलेली असल्याचे पाहून, त्या
घरात राहणाऱ्याला जमावाने मारहाण केली होती आणि त्याचे घरही पेटविले होते.अशा घटनांचा निषेध प्रत्येकाकडून झाला आहे.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर दुसऱ्यांदा बोलले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा घटना घडत असून त्या घृणास्पद व क्रूर आहेत. या घटनांशी कोणताही धार्मिक मुद्दा जोडलेला नाही, असे नायडू यांनी म्हटले.
ताजी घटना ही झारखंडमधील रामगढ येथील असून तेथे जमावाने अलिमुद्दिन असघर याला ठार मारले. अलिमुद्दिन हा त्याच्या वाहनातून गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला अडवले होते. गोरक्षकांनी गायीचे
नाव घेऊन माणसांना ठार मारणे सहन केले जाणार नाही, असे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात केलेल्या भाषणात म्हणाले होते. त्यानंतर झारखंडमध्ये दुसरी घटना घडली.
आतापर्यंत २४ घटना-
देशात मे २0१४पासून गोरक्षणाच्या नावाखाली विविध राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या ३२ हल्ल्यांमध्ये २४ जण मरण पावले आहेत. अशा हल्ल्यांमध्ये
५0 जण जखमी झाले असून, दोन बलात्काराचे प्रकारही घडले आहेत.