उरीमध्ये दहा दहशतवादयांचा खात्मा, एक जवान शहीद
By admin | Published: September 20, 2016 05:45 PM2016-09-20T17:45:57+5:302016-09-20T18:19:23+5:30
भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहिद झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि.२० : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवादयांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. या हल्याला दोन दिवस झाले नाहीत तोवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उलघंन केलं आहे. भारतीय पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला असून जवळपास २० राउडं फायरींग करण्यात आल्या आहेत.
भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहीद झाला आहे. गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी आणखी पाच ते सहा दहशतवादी दडून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरुच आहे.
उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा ना'पाक' कुरापती केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.