दुष्मनाची पाणबुडी उडवू शकणारी ‘किल्तान’ युद्धनौका नौदलात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:19 AM2017-10-17T01:19:27+5:302017-10-17T05:36:22+5:30
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे.
विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे. खास पाणबुडीविरोधी तंत्रज्ञान हे किल्तानचे वैशिष्टय आहे. शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकांनंतर कल्तान ही स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे.
अत्याधुनिक शस्त्रसाठा
हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने आयएनएस सुसज्ज आहे तसेच किल्तानवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणाºया रेवती या दोन रडार यंत्रणा आहेत.
डिझाईन येथेच केले
कार्बन फायबरचा वापर करुन बांधलेली ही पहिली भारतीय युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते. नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाइन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ती बांधली आहे.
हे नाव कशामुळे दिले?
किल्तान हे लक्षद्वीप बेटसमूहाचा भाग आहे. त्यामुळेच या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट
1947 किलोमीटर अंतरावर आहे. त्या बेटाची लोकसंख्या 4041 इतकीच आहे. एके काळी पर्शियन आखाताहून श्रीलंके (सिलोन)कडे होणाºया आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मार्गातील हे बेट महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे.