जंगलाच्या राजाला चिकन, मटण खाऊन ढकलावे लागतायत दिवस
By admin | Published: March 27, 2017 12:58 PM2017-03-27T12:58:45+5:302017-03-27T12:58:45+5:30
राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे जंगलचा राजा असलेल्या सिंहावरच चिकन, मटणावर गुजराण करण्याची वेळ ओढवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 27 - राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांविरोधात उत्तरप्रदेश सरकारने उघडलेल्या मोहिमेमुळे जंगलचा राजा असलेल्या सिंहावरच चिकन, मटणावर गुजराण करण्याची वेळ ओढवली आहे. लखनऊ प्राणी संग्रहालयातील वाघ, सिंहांना खाण्यासाठी मटण, चिकन दिले जात आहे. इठावा येथीय लायन सफारी पार्कमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तिथे असलेल्या सिंहाना सफेद मटण खाऊन दिवस काढावे लागत आहेत.
प्राणी संग्रहालयातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दिवसाला 235 किलो म्हशीचे मटण लागते. पण मागच्या दोन दिवसांपासून फक्त 80 किलो मटणाचा पुरवठा झाला आहे. वाघ-सिंह बछडे असेपर्यंत त्यांना पक्ष्यांचे मांस दिले जाते पण नंतर त्यांना म्हशीचे मांस दिले जाते. लखनऊ प्राणी संग्रहालयात सध्या 47 प्राणी आहेत. सात वाघ, चार सफेद वाघ, आठ सिंह, आठ बिबटे, 12 जंगली मांजरी, दोन तरस, दोन कोल्हे असे प्राणी आहेत.
हे सर्व प्राणी मांसाहारावर अवलंबून आहेत अशी माहिती अधिका-यांनी दिली. कत्तलखान्यांवर बंदी आल्यापासून प्राणी संग्रहालयांना कमी झालेला मांसाचा पुरवठा प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत कंत्राटदार मागणीइतका मांसाचा पुरवठा करायचे पण कत्तलखान्यांवरील बंदीमुळे त्यांच्यासाठी मांस उपलब्ध करुन देणे कठीण बनले आहे. आम्ही सिंहांना चिकन, मटणाचा आहार देत असलो तरी, त्यात फॅटचे प्रमाण कमी असल्याने हा आहार पुरेसा नाही असे इठावाच्या लायन सफारी पार्कमधील अधिका-यांनी सांगितले.