सरकारी पॅलेसवर ‘राजे’शाही
By admin | Published: June 30, 2015 02:01 AM2015-06-30T02:01:00+5:302015-06-30T02:01:00+5:30
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘ललितगेट’ वादामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच नव्या आरोपांमुळे राजे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
वसुंधरा राजे यांचे विभक्त झालेले पती हेमंतसिंग यांनी धोलपूर पॅलेस ही राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. १९५४ ते २०१० या काळात महसूल विभागाच्या अनेक दस्तऐवजातही तसा उल्लेख आढळतो. राजे आणि ललित मोदी यांच्या नियंत हेरिटेज हॉटेल या कंपनीने धोलपूर पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करताना शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारची कोणतीही भूमिका राहिली नाही. २००९ नंतर हे घडले. राजे यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात नियंत हेरिटेज हॉटेलमध्ये पुत्र दुष्यंतसिंग, सून निहारिका व ललित मोदी यांच्यासोबत शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख केला. राजेंकडे ३२८०, तर पुत्र व सुनेकडे प्रत्येकी ३२२५ शेअर्स तर मोदी यांच्या आनंद हेरिटेज हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये ८१५ शेअर्स असल्याची बाब राजे यांनी नमूद केली. यातून त्यांचे फरार मोदींशी असलेले व्यावसायिक संबंध उघड होतात, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
या कंपनीत गुंतवणुकीसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंबण्यात आला. कर वाचविण्यासाठी मॉरिशसमध्ये गुंतवणूक दाखविण्यात आली असा आरोपही रमेश यांनी केला. ललित मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळून असल्याबद्दल रमेश यांनी त्यांना ‘स्वामी मौनेंद्र बाबा’ असे संबोधत टर उडविली.
भाजपने आरोप फेटाळला
धोलपूर पॅलेस खासदार दुष्यंतसिंग यांच्या मालकीचा नसल्याचा रमेश यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी व राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी फेटाळला आहे. हेमंतसिंग यांनी धोलपूरची मालकी दुष्यंत यांच्याकडे सोपविल्यासंबंधी न्यायालयीन दस्तऐवज दाखवत परनामी यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान योग्य वेळी बोलतील-सिंग
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते योग्य वेळ येताच बोलतील, असे सांगत केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी मोदींच्या मौनाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.