"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:12 PM2024-05-08T19:12:56+5:302024-05-08T19:14:02+5:30
DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Prajwal Revanna Scandal Case : बंगळुरु : कर्नाटकातील अश्लिल व्हिडीओ प्रकरणात अडकलेल्या प्रज्वल रेवण्णाच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. प्रज्वल रेवण्णाचे वडील एचडी रेवण्णा यांना कर्नाटक एसआयटीने अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
डीके शिवकुमार यांनी व्हिडिओ व्हायरल करणे हे एचडी कुमारस्वामी यांचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. डीके शिवकुमार म्हणाले की, एचडी कुमारस्वामी हे कहाणीचे मुख्य दिग्दर्शक आणि निर्माते होते. ते ब्लॅकमेलिंगचे बादशहा आहेत. तसेच, एचडी कुमारस्वामी यांना पेनड्राइव्हची माहिती होती. लोकांची राजकीय कारकीर्द संपवणे आणि इतरांना ब्लॅकमेल करणे, हे एचडी कुमारस्वामी यांचे काम आहे, असा दावा डीके शिवकुमार यांनी केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एचडी कुमारस्वामी यांना पेन-ड्राइव्हची पूर्ण माहिती होती, असे एका वकील आणि इतर लोक सांगत आहेत, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. तसेच, एचडी कुमारस्वामींना माझा राजीनामा पाहिजे आहे. तर यावरून असे दिसते की, ते वोक्कालिगा नेतृत्वासाठी माझ्याशी स्पर्धा करत आहेत, असेही डीके शिवकुमार म्हणाले.
एचडी कुमारस्वामी यांनी काय केला होता दावा?
दरम्यान, जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर मोठा दावा केला होता. प्रज्वल रेवण्णाच्या कथित सेक्स स्कँडलशी संबंधित 25,000 पेन ड्राईव्ह निवडणुकीपूर्वी वितरित करण्यात आल्याचे एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले होते. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर आरोप केले होते. ते म्हणाले की, व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात प्रसिद्ध करण्यात आला होता, जिथून डीके शिवकुमार यांचा भाऊ देखील निवडणूक लढवत आहे.