लोकसभेचे किंगमेकर : बीजेडी, टीआरएस, वायएसआर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:55 AM2019-02-08T04:55:30+5:302019-02-08T11:51:05+5:30
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू वा बसपाच्या मायावती निवडणुकांमध्ये लोकसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत नसेल तर किंगमेकर बनतील हे निवडणूक तज्ज्ञांचे भाकीत चुकीचं ठरण्याची शक्यता आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू वा बसपाच्या मायावती निवडणुकांमध्ये लोकसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत नसेल तर किंगमेकर बनतील हे निवडणूक तज्ज्ञांचे भाकीत चुकीचं ठरण्याची शक्यता आहे. आता तीन नवे किंगमेकर राजकीय क्षितिजावर असून ते कोणत्याही गटामध्ये सहभागी नाहीत. बिजू जनता दल (ओडिशा), वायएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश) आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती (तेलंगणा) लोकसभेच्या ४५ ते ५० जागा जिंकण्याची शक्यता असून भाजपाला जर २०० जागांवरच समाधान मानावे लागल्यास हे पक्ष नवे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.
या तिन्ही पक्षांनी तटस्थ राहून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक तज्ज्ञांनुसार वायएसआर काँग्रेस लोकसभेच्या २५ जागा असलेल्या आंध्र प्रदेशात प्रभावी आहे. हा पक्ष काँग्रेसमधूनच निर्माण झाला आहे. विमान अपघातात वडिलांचे निधन झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी पक्षात बंड करून वायसआर काँग्रेस स्थापन केला. जगनमोहन रेड्डी यांना लोकसभेच्या १५-१७ जागा आपण जिंकू अशी खात्री आहे. चंद्रबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडण्याचे एक कारण भाजपा आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील वाढते संबंध हे आहे. त्यांच्यातील वाढत्या मैत्रीचा आणखी एक संकेत म्हणजे प्रशांत किशोर हे वायएसआर काँग्रेसचे निवडणूक रणनीती ठरवण्याचे करीत असलेले काम. जगनमोहन रेड्डी यांनी किशोर यांना हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात मोठी जागा दिली आहे. ते तेथून निवडणूक मोहीम चालवत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभेच्या १७ पैकी १५ जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. केसीआर यांनी विधानसभा निवडणुकीत फार मोठे यश मिळवून आपले स्थान दाखवून दिले. काँग्रेस व भाजपा तेलंगणात सर्व १७ जागा लढवत आहेत. परंतु, निवडणूक तज्ज्ञांच्या मते त्या दोघांनाही शून्य यश मिळेल.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल १५ ते १७ जागा जिंकेल. बिजू जनता दलाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २१ पैकी २० जागा तर भाजपाने एक जागा जिंकली होती. नवीन पटनाईक यांना शांत करण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे. बिजू जनता दलाचा राजीनामा देऊन बी. जे. पांडा भाजपात दाखल झाले त्यांनाही भाजपाने बाजुला ठेवले असल्यामुळे ते आता नाराज व एकाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पुरीमधून निवडणूक लढवून पटनाईक यांच्याशी दोन हात करण्याचा विचार केला होता. आता मात्र ते त्या विचारात नाहीत.
नवीन पटनाईक यांच्या भगिनी गीता मेहता यांना मोदी यांनी पद्मश्री किताब देऊ केला. परंतु, त्यांनी तो चुकीची राजकीय संदेश जाईल, असे सांगून तो नाकारला. बिजू जनता दल व भाजपा यांच्यातील संबंधांचा आणखी एक संकेत म्हणजे बिजदचे नेते चिटफंड घोटाळ््यात गुंतलेले असूनही सीबीआय शांतच आहे.
रालोआकडून अपेक्षा कमीच
भाजपा २०० जागांच्या पुढे न गेल्यास या ५० जागा महत्त्वाची भूमिका बजावतील. रालोआतील घटक पक्ष (शिवसेना, जेडीयू, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, अकाली दल, अण्णा अद्रमुक) जेमतेम २५-३० जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच भाजपा व नरेंद्र मोदी यांना नव्या किंगमेकरची गरज नक्कीच भासेल.