श्रेष्ठींना न भेटताच राजे परतल्या
By admin | Published: June 28, 2015 03:39 AM2015-06-28T03:39:09+5:302015-06-28T03:39:09+5:30
ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या.
नवी दिल्ली : ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. परंतु बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी कुणालाही न भेटताच त्या जयपूरला परतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राजे यांनी स्वत: पक्ष नेत्यांना भेटण्याचे टाळले, की त्यांना भेट नाकारण्यात आली,याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.
विरोधी पक्षांकडून राजे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असून पक्षाकडून मात्र त्यांची पाठराखण केली जात आहे. राजे सकाळी ९.३० वाजता दिल्लीत पोहोचल्या आणि जवळपास चार तासांनी जयपूरला परतही गेल्या. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान तसेच पक्षाध्यक्षांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता की नाही याबाबत पक्ष सूत्रांनी मौन धारण केले आहे.
गुरुवारी रात्री मोदी आणि शहा यांच्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी या वादावर राजे यांनी दिलेले स्पष्टीकरण मान्य केले असल्याचे संकेत मिळाले होते. राजे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आपला पूर्वनियोजित लंडन दौरा रद्द केला होता. त्या २७ जून ते २ जुलै दरम्यान लंडन दौऱ्यावर जाणार होत्या.
जयपूर येथून मिळालेल्या वृत्तानुसार नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर राजे विशेष विमानाने जयपूरला परतल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- राजस्थान प्रदेश भाजपने वसुंधरा राजे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतरण अर्जाच्या समर्थनात वसुंधरा राजे यांनी स्वाक्षरी केलेले दस्तावेज कधी न्यायालयात सादर झालेच नाहीत. कारण नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती, असा खुलासा प्रदेश शाखेने केला आहे. राजे यांच्या मुलाच्या हॉटेलमध्ये मोदी यांनी केलेली गुंतवणूक कायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती, असाही संघटनेचा दावा आहे.