किरण बेदी भाजपाच्या तंबूत दाखल
By admin | Published: January 16, 2015 06:29 AM2015-01-16T06:29:38+5:302015-01-16T06:29:38+5:30
टीम अण्णाच्या माजी सदस्य तथा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या किरण बेदी गुरुवारी भाजपामध्ये दाखल झाल्या असून, त्या या पक्षाकडून दिल्ली विधानसभेची निवडणूक लढणार आहेत.
नवी दिल्ली : टीम अण्णाच्या माजी सदस्य तथा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या किरण बेदी गुरुवारी भाजपामध्ये दाखल झाल्या असून, त्या या पक्षाकडून दिल्ली विधानसभेची निवडणूक लढणार आहेत.
एकेकाळी आयपीएस अधिकारी म्हणून कारकिर्द गाजविणाऱ्या ६५वर्षीय किरण बेदी यांनी दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करताच त्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील काय? असे विचारण्यात आले असता शहा म्हणाले की, निवडणूक निकाल जाहीर होताच पक्षाचे संसदीय मंडळ त्याबाबत निर्णय घेईल. बेदी यांच्या प्रवेशामुळे दिल्ली प्रदेश भाजपाला बळकटी मिळाली आहे. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध किरण बेदींना उभे केले जाणार असल्याचे तर्कवितर्क सुरू आहेत. बेदींच्या मतदारसंघाबाबत निर्णय नंतर घेतला जाईल. बेदींच्या विधायक योगदानामुळे भाजपला निवडणुकीत आणि भविष्यातील सरकारच्या माध्यमातून लोीकांच्या इच्छेला खरे उतरणे शक्य होईल, असेही शहा यांनी भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत नमूद केले. किरण बेदींनी राजकारणात उडी घ्यावी यासाठी मी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. मी बेदीजींचा चाहता राहिलो आहे. त्यांनी राजकारणात यावे यासाठी मी नेहमीच आग्रही होतो. त्या आज राजकारणात आल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. पण आम आदमी पार्टीने घेतलेल्या पत्रपरिषदेत बेदींचा भाजपा प्रवेशाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.
बसपा सर्व जागा लढणार
लखनौमध्ये दिल्लीत विधानसभेच्या सर्व ७० जागा लढविणार असल्याची घोषणा बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी आपल्या ५९ व्या वाढदिवशी लखनौ येथे केली. मी दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात करीत आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मायावती यांनी आपला वाढदिवस ‘लोककल्याण दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणाही केली.
संघाच्या अजेंड्यासाठी सामान्यांकडे दुर्लक्ष
नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबविताना अल्पसंख्यक समुदाय आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही मायावती यांनी केला. हे सरकार आपली मुख्य संघटना म्हणजे रा.स्व. संघाचा अजेंडा राबवितानाच भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देत आहे. (विशेष प्रतिनिधी)