Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:57 PM2022-01-25T15:57:41+5:302022-01-25T16:04:17+5:30
Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे.
नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijij) यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यातील समन्वयावर बोलताना न्यायाधीशांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलले पाहिजे, परिस्थिती समजून घेतली पाहिजे. न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असायला हवा, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये', असे वक्तव्य रिजिजू यांनी केले आहे. ते मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
टीका करताना भाषेची मर्यादा असावी
रिजिजू म्हणाले की, 'देशभरातील नागरिकांकडे मतदार कार्ड आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे आह. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम काम केले आहे. माझा स्वत:चा गेल्या 7 निवडणुका लढवण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. यामुळेच भारताची लोकशाही मजबूत होते. कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. कठोर टीका करण्यात काही नुकसान नाही, परंतु चांगल्या कृतींचे कौतुकदेखील केले पाहिजे', असेही ते म्हणाले.
Those elements who are trying to discredit the Election Commission of India are actually trying to discredit the democracy of India: Kiren Rijiju, Union Minister of Law and Justice on National Voter's Day pic.twitter.com/RuG5xhQpWg
— ANI (@ANI) January 25, 2022
आयोगाचे काम कौतुकास्पद
रिजिजू पुढे म्हणाले, 'न्यायमूर्तींनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलावे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आगामी काळात आणखी निवडणूक सुधारणा केल्या जातील, पण आयोगावर टीका योग्य नाही. कोविड-19 दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचे काम केले, ते कौतुकास्पद आहे. आयोगाने लोकशाही व्यवस्थेत अडचण येऊ दिली नाही, अशा स्थितीत आयोगावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये
याावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, मतदान हा एक महत्त्वाचा नागरी हक्क आहे आणि यातून लोकशाही राज्यघटनेवरचा विश्वास दिसून येतो. निवडणुकीत सर्व मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सध्या देशात 95.3 कोटी मतदार आहेत. यंत्रणेअभावी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. कोविड-19 काळात आयोगाने अपवादात्मक परिस्थितीत काम केले, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे, असे ते म्हणाले.