'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 06:12 PM2023-04-15T18:12:31+5:302023-04-15T18:13:30+5:30
एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. थेट केजरीवाल यांनाच समन्स बजावल्याने दिल्लीत राजकीय खळबळ उडाली आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे.
यातच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अरविंद केजरीवाल यांच्या एका ट्विटवरून निशाना साधत, जर न्यायालयही आपल्या विरोधात गेले, तर न्यायालया विरोधात न्यायालयात जाणार का? असा सवाल केला. खरे तर, अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दुपारी एक ट्विट करत, "आम्ही खोटी साक्ष दिल्याबद्दल आणि न्यायालयात खोटे पुरावे सादर केल्याबद्दल सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करू," असे म्हटले होते.
केजरीवाल यांच्या या ट्विटवर उत्तर देत किरेन रिजिजू म्हणाले, "हा उल्लेख करायला विसरले की, जर माननीय न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवले, तर आपण त्या विरोधातही गुन्हा दाखल कराल. कायद्याला आपले काम करू द्या आणि आपण कायद्यांवर विश्वास ठेवायला हवा." एवढेच नाही, तर "ED, CBI विरोधात न्यायालयात जाल आणि जर न्यायालयही विरोधात गेले, तर पुन्हा न्यायालयाविरोधातही जाणार?" असा सवालही रिजिजू यांनी केला आहे.
Forgot to mention that you will file case against Honble court also if it convicts you. Let law takes it own course & we must believe in rule of law.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 15, 2023
ED, CBI के ख़िलाफ़ कोर्ट जाओगे और अगर कोर्ट भी ख़िलाफ़ गई तो फिर कोर्ट के ख़िलाफ़ भी जाओगे? pic.twitter.com/YAxSqE1bEx
आज राजधानी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, तपास संस्थेने अबकारी धोरण प्रकरणात आपल्याला समन्स बजावले आहे. आपण 16 एप्रिलला सीबीआईकडून होणाऱ्या चौकशीत सहभागी होणार आहोत.