कीर्ती आझाद भाजपातून निलंबित; अरुण जेटलींवरील टीका भोवली

By Admin | Published: December 24, 2015 02:42 AM2015-12-24T02:42:15+5:302015-12-24T02:42:15+5:30

डीडीसीएमधील गैरप्रकारावरून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले.

Kirti Azad suspended from BJP; Arun Jaitley criticized Bhola | कीर्ती आझाद भाजपातून निलंबित; अरुण जेटलींवरील टीका भोवली

कीर्ती आझाद भाजपातून निलंबित; अरुण जेटलींवरील टीका भोवली

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील (डीडीसीए) गैरप्रकारावरून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले. पण ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे अनुकरण करीत जेटलींनी राजीनामा द्यावा, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कारवाई करणे पक्षाने टाळले. स्वपक्षीयांना थोपविण्याची कसरत करतानाच भाजपाला बुधवारी आम आदमी पार्टीच्या आक्रमकतेलाही तोंड द्यावे लागले.
‘दरभंगाचे खासदार व माजी क्रिकेटपटू आझाद यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपातर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. आझाद यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांना त्यांच्या ‘पक्षविरोधी वर्तणुकी’मागचे कारण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या उत्तरावरच पुढची कारवाई निर्भर राहील, असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.
आझाद यांनी पक्षाध्यक्ष शहा यांचा आदेश धुडकावला होता आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील (डीडीसीए) भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी रविवारी पत्रपरिषद घेतली होती. जेटली हे २०१३ पर्यंत सलग १३ वर्षे या डीडीसीएचे अध्यक्ष होते.
खा. आझाद यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि पक्षाशी नाराज असलेले खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिलेला आहे. आझाद यांनी रविवारच्या पत्रपरिषदेनंतर सोशल मीडियावर खुले आव्हान दिले होते आणि संसदेतही जेटली यांना लक्ष्य बनविले होते. त्यामुळे पक्षाने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे.
कारवाई केली जाईल, असे संकेत मिळाल्यानंतरही आझाद यांची आक्रमकता कमी झाली नव्हती. जेटली यांनीही डीडीसीए घोटाळ्याबाबत आझाद यांनी केलेल्या आरोपावर मौन पाळले होते. तथापि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध मात्र त्यांनी अबु्रनुकसानीचा दहा कोटींचा दिवाणी दावा ठोकला आहे. भाजपा जेटलींच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र असले, तरी हवाला डायरी प्रकरणात आडवाणींनी राजीनामा देऊन प्रकरण तडीस जाईपर्यंत संसदेत पाऊल टाकण्याचे टाळल्याच्या इतिहासाला पक्षातूनच काही जण उजाळा देऊ लागले आहेत. जेटली या आरोपातून आडवाणींप्रमाणेच निष्कलंक होऊन बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पूर्वेतिहासाला अप्रत्यक्ष उजाळाच दिला.

-शत्रुघ्न सिन्हांचा सल्ला
हवाला प्रकरणी राजीनामा देणारे लालकृष्ण अडवाणी यांचे अनुकरण करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सल्ल्या’प्रमाणे ‘निष्कलंक’ व्हा, असे आवाहन भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांना केले आहे. जेटली यांनी राजीनामा द्यावा, असा अप्रत्यक्ष सल्ला देणारे सिन्हा यांनी डीडीसीए घोटाळ्यावरून जेटली यांच्याविरुद्ध आरोप करणारे कीर्ती आझाद यांना ‘हीरो आॅफ द डे’ असे संबोधले.

Web Title: Kirti Azad suspended from BJP; Arun Jaitley criticized Bhola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.