कीर्ती आझाद यांचा हल्लाबोल सुरूच
By admin | Published: December 31, 2015 04:19 AM2015-12-31T04:19:21+5:302015-12-31T04:19:21+5:30
भाजपातून निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पाठोपाठ पक्षाचे खासदार व बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांना लक्ष्य केले.
नवी दिल्ली : भाजपातून निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पाठोपाठ पक्षाचे खासदार व बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांना लक्ष्य केले. एसएफआयओच्या चौकशी अहवालात दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहार प्रकरणी जेटलींविरुद्ध ‘खटला’ चालविण्याची शिफारस केली गेली होती, असा दावाही त्यांनी केला.
डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने एका महिलेकडे तिच्या मुलास क्रिकेट टीममध्ये घेण्याच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली होती, या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोपाचेही कीर्ती यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. मी २००७ मध्ये असाच मुद्दा उपस्थित केला होता, असे ते म्हणाले. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना डीडीसीएमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराची पूर्ण माहिती होती. तरीही त्यांनी तो लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला.