'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:07 AM2021-07-19T08:07:23+5:302021-07-19T08:08:17+5:30
यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती.
नवी दिल्ली- तिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर (टीकरी, सिंघू, शाहजहांपूर आणि गाजीपूर) बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुढील आठवड्यात 8 महिने होतील. यातच, उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. (kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles)
"शेतकरी तर परत येणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. 5 सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. देशात लढाई होईल, असे वाटते, की युद्ध होणार," असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
टिकैतांच्या याच वक्तव्यावर, फिल्ममेकर आणि इंडियन फिल्म अँड टीवी डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashoke Pandit) भडकले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की 'खलिस्तान्यांच्या आणि पाकिस्तानच्या पैशांनी देशाविरोधात युद्ध करण्याची यांची इच्छा आहे! देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत टिकैत जी!"
खलिस्तनियों और पाकिस्तनियों के पैसों से देश के ख़िलाफ़ जंग करना चाहते हैं यह भाई साहब !
— Ashoke Pandit (@ashokepandit) July 16, 2021
देश ने चूड़ियाँ नहीं पहनी है टिकैत जी ! pic.twitter.com/T6hXNLiGTa
यापूर्वीही अशोक पंडित यांनी अनेक वेळा ट्विट करत राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तेव्ह, आपण आंदोलन स्थळावरच कोरोना लस घेणार, असे टिकैत म्हणाले होते. एवढेच नाही, तर येथील प्रत्येक आंदोलकाला कोरोना लस टोचावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अशोक पंडित यांनी ट्विट करत, हा काही 'हलवा' नाही, असे म्हटले होते.
...तर आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील -
तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.