टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 11:53 AM2021-02-07T11:53:31+5:302021-02-07T11:54:53+5:30
Kisan Suicide At Tikri Border : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे.
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला शेतकरी काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सामील झाला होता. आत्महत्या केलेला शेतकरी शनिवारी रात्री अतिशय निराश होता, असं त्याच्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. टिकरी सीमेवर या शेतकऱ्यानं रात्री उशिरा गळफास घेतला. (farmer suicide at Tikri border left suicide note)
आत्महत्या केलेला शेतकरी जींदच्या सिंहवाला येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव दरियाव सिंह असून तो ५० वर्षांचा होता. टिकरी येथील एका बस स्टँडजवळील झाडाला प्लास्टिकच्या रशीनं गळफास घेत दरियाव यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतकऱ्यांना दरियाव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एक सुसाईड नोट देखील आढळून आली.
सुसाइड नोटमध्ये मोदी सरकारचा उल्लेख
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. "भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही", असं लिहून शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय.
पोलिसांकडून मृतदेह ताब्यात
रविवारी सकाळी शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच मृतदेह झाडावरुन खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पीटलमध्ये पाठवला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनाही याची माहिती देण्यात आली आहे. हॉस्पीटलमध्ये कुटुंबिय आल्यानंतरच मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे.