Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:17 PM2018-10-02T16:17:42+5:302018-10-02T16:22:51+5:30
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद
नवी दिल्ली: आपल्या विविध मागण्यांसाठी हरिद्वारहून सुरू झालेली हजारो शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीच्या सीमेवर पोहोचली आहे. भारतीय किसान युनियनच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी लाठीमार केल्यानं परिस्थिती काही वेळासाठी तणावपूर्ण झाली होती. यानंतर मोदी सरकारकडून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या चार मागण्या केल्या.
शेतकऱ्यांची पदयात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारला मान्य असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनं आमच्या 4 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांना 5 टक्केच जीएसटी लावण्यात यावा, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर्सवर राष्ट्रीय हरित लवादानं लादलेले निर्बंध हटवण्यात यावे या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कमी दरानं होणारी विक्री रोखण्यासाठी कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. पीक विम्याबद्दलची शेतकऱ्यांची मागणीदेखील सरकारनं मान्य केली आहे. मात्र स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबद्दल अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही.