किसान मोर्चाचा १८ रोजी देशात रेल रोकोचा इशारा, मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:45 AM2021-10-10T06:45:42+5:302021-10-10T06:46:06+5:30
Farmer protest: लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सोमवारी. ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविले न गेल्यास तसेच त्यांचा पुत्र आशिष याला अटक न झाल्यास संयुक्त किसान मोर्चा १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार आहे.
लखनऊ : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सोमवारी. ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविले न गेल्यास तसेच त्यांचा पुत्र आशिष याला अटक न झाल्यास संयुक्त किसान मोर्चा १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनात जे शेतकरी मरण पावले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या मंगळवारी तिकुनिया गावामध्ये आयोजिलेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.
लखीमपूर खेरी हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले आहे. तसेच स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र त्यामुळे शेतकरी आंदोलकांचे अजिबात समाधान झालेले नाही. या हिंसाचारातील आरोपींना वाचविण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न आहेत, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी जबाबदार असलेल्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे. पण त्या दिशेने उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.