संघ स्वयंसेवक असल्यापासून मैत्रीचं नातं, मोदींनी जिगरी दोस्ताला दिलं 'खास' खातं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:53 PM2019-05-31T15:53:19+5:302019-05-31T16:51:19+5:30
शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नरेंद्र मोदींचे अगदी जवळचे मित्र जी. किशन रेड्डी यांना गृहराज्यमंत्रीपद दिले आहे.
अगदी सामान्य कुटुंबातून आलेले जी. किशन रेड्डी हे नरेंद्र मोदींना संघ स्वयंसेवक असल्यापासून अगदी जवळून ओळखतात. १९९४ मध्ये ते मोदींसोबत अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेलंगणमध्ये पहिल्यांदाच भाजपाचे चार खासदार विजयी झाले आहेत. या यशामध्ये जी. किशन रेड्डी यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याचं बक्षीस म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले. २००४ मध्ये रेड्डी यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि आंध्र प्रदेश विधानसभेत ते आमदार झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते निवडून आले होते. याशिवाय, जी. किशन रेड्डी यांनी तीन वेळा संयुक्त आंध्र प्रदेशचे भाजपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात देशाचा गृह कारभार अशा दोन नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे की, ते हिंदू विचारधारेचे आहेत. अमित शहा आधीपासून हिंदुत्ववादी आहेत आणि जी. किशन रेड्डी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे देशातील हिंदुत्ववादी मुद्यावर भाजपा ठाम असल्याचे दिसून येते.